60 हजार सुपूर्द : आणखी निधी जमा करण्याचे आवाहन
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून व भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथे 32 मण सुवर्णसिंहासन उभारण्याचा संकल्प करण्यात आला. सुवर्णसिंहासनासाठी शिवभक्तांकडून कर्तव्य निधी जमा केला जात आहे. बेळगावचे धारकरी सदानंद गुंडूराव जांगळे यांनी आपली कन्या श्रेष्ठा जांगळे हिच्या वाढदिवसानिमित्त एक तोळा सोन्याच्या रकमेचा (60 हजार रुपये) धनादेश प्रांतप्रमुख किरण गावडे व जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. प्रारंभी जांगळे कुटुंबीयांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, हिरामणी मुचंडीकर, गिरीश पाटील, किरण बडवाण्णाचे, गजानन पाटील, महेश जांगळे, गजानन निलजकर तसेच इतर शिवभक्त उपस्थित होते. किल्ले रायगडावर 32 मण सुवर्णसिंहासन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्णत्वास येण्यासाठी प्रत्येक हिंदूने आपल्याला शक्य तितका कर्तव्यनिधी जमा करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या सदानंद जांगळे यांनी कर्तव्यनिधी देऊन शिवभक्तांसमोर आदर्श निर्माण केला आहे.








