ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशभरात उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाकडून आनंदाची बातमी आहे. मान्सून सर्वांचे अंदाच चुकवत तीन दिवस आधीच आज दुपारी अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल झाला.
भारतीय हवामान विभाग आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट या दोन्ही हवामान संस्थेकडून यंदाचा मान्सून लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सर्वांचा अंदाज चुकवत आज दुपारी 2 च्या सुमारास मान्सून अंदमान आणि बंगालच्या उपसागरात दाखल झाला. मान्सून वेगाने प्रगती करत असून तो लवकरच निकोबार बेटाचा दक्षिण भाग आणि बंगालच्या उपसागरातील क्षेत्राला व्यापणार आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसात देवभूमी केरळच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकटास मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मान्सून 4 जूनपर्यंत केरळात
मान्सूनच्या वाऱ्याची दिशा व गती यावर त्याचे अंदाज बांधले जातात. मान्सून अंदमानात लवकर दाखल झाल्यामुळे 4 जूनपर्यंत तो केरळात दाखल होईल. त्यानंतर मान्सून तळ कोकणातून राज्यात दाखल होईल, असे पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.








