वारणानगर / प्रतिनिधी
कागल महामार्गावरील सहापदरीकरणात हातकणंगले तालुक्यातील घुणकी फाटा ते वारणा नदी पूल दरम्यान दोन्ही बाजूने सेवा रस्ते आणि चार ठिकाणी सबवे (बोगदा) करावेत अशा सूचना आमदार विनय कोरे यांनी आज गुरुवार दि. १८ रोजी वारणानगर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शुक्रवारी सकाळी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत असल्याचे आश्वासन अधिकारी व कंत्राटदार यांनी दिले.
सध्या सातारा ते कागल दरम्यानचे सहापदरीकरण सुरू आहे. या सहापदरीकरणाच्या कामात घुणकी फाटा ते वारणा नदीचे पूल दरम्यान सेवा रस्ता आणि महापूर प्रसंगी शेतातील पाणी जाण्यासाठी सबवे नसल्याचे समजलेवरुन वारणाचे संचालक सुभाष जाधव, प्रदीप देशमुख, राजवर्धन मोहिते, संजय पाटील यांनी आमदार डॉ विनय कोरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. डॉ. कोरे व राष्ट्रीय प्राधिकरणचे मिलींद श्रीराव, रोडवे सोल्युएशन इंडिया इन्फ्रा कंपनीचे कंत्राटदार के. पी. सिंग, विनोद जमदाडे उपस्थित होते.
डॉ. कोरे म्हणाले, घुणकी फाटा ते वारणा नदीचे पूल दरम्यान शेकडो एकर शेती आहे. सहापदरीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता नसल्याने शेतातील माल रस्त्यावर आणता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच घुणकी फाटा ते वारणा नदी दरम्यान चार सब वे करावेत. अशा सूचना डॉ. कोरे यांनी दिल्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणचे मिलींद श्रीराव, रोडवे सोल्युएशन इंडिया इन्फ्रा कंपनीचे कंत्राटदार के. पी. सिंग, विनोद जमदाडे यांनी शुक्रवारी (ता.१९) सकाळी घुणकी फाट्यावर भेट देऊन पाहणी करीत असल्याचे आश्वासन दिले.