ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा करणारे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जाधव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सुषमा अंधारे पक्षातील विविध पदांसाठी कार्यकर्त्यांकडून पैसे घेत आहेत. तसेच त्यांच्या कार्यालयात एसी, सोफा आणि फर्निचर करण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांनकडून पैसे घेत असल्याचा आरोप ही जाधव यांनी केला होता. अंधारेंच्या या कृत्यामुळे आपण त्यांच्या दोन कानशिलात लगावल्या, असा दावा जाधव यांनी करत एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 20 मे रोजी बीडमध्ये होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच हा पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.
अंधारेंनी आरोप फेटाळले
अप्पासाहेब जाधव यांनी केलेले सर्व आरोप अंधारे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच मला कुठेतरी गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने लिहिलेली ही स्क्रिप्ट असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.








