पुणे / प्रतिनिधी :
जागतिक मंदीचे रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधीत करीत भारतीय अर्थव्यवस्थेला पाचव्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. भारतातील महागाईही इतर देशांच्या तुलनेत कमी असून, गरिबीही घटत असल्याचा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.
नड्डा यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, आज लोकसभेत पक्षाचे 303, तर राज्यसभेत 93 खासदार आहेत. आमदारांची संख्याही जवळपास 1300 च्या वर आहे. लोकांच्या पाठिंब्याच्याच बळावर आपण येथवर येऊन पोहोचलो आहोत. मात्र, आपल्याला थांबून चालणार नाही. आगामी काळातही रिझल्ट आपल्या बाजूने येतीलच. परंतु, बूथ स्तरावर आपल्याला आणखी भरीव काम करायचे आहे. तसेच बूथ संख्या 10 लाख 40 हजारवर न्यायची आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने सुरू केल्याने सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडला आहे. मोदी यांनी संकटाचे संधीत रुपांतर केले. जागतिक मंदीतही भारत तगून असून, अमेरिका, यूरोप, रशियासह इतर देशांतील महागाईच्या तुलनेत आपल्याकडची महागाई कमीच आहे. काँग्रेसने गरिबी हटाव या घोषणेच्या आधारावर 30 वर्षे राजकारण करीत पोळी भाजून घेतली. मात्र, प्रत्यक्षात गरिबी हटली नाही. मात्र, भाजपाच्या सत्ताकाळात अतिगरिबीच्या पातळीवरचा आपला टक्काही घसरल्याचे दिसून येत आहे. देशातील गरिबी एक टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मागच्या 70 वर्षांत केवळ 74 विमानतळ उभारण्यात आले. तर मोदीकाळातील केवळ 9 वर्षात तब्बल 74 एअरपोर्ट सुरू करण्यात आले. हा खरा विकास आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आगामी निवडणुकीत भाजपा निवडून येईलच. किंबहुना, कार्यकर्त्यांनी पोलिटिकल अजेंडा सेट करावा. तसेच बाहेरच्या प्रभावात राहू नये, असा संदेशही त्यांनी दिला.







