क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
मडगाव क्रिकेट अकादमी आयोजित मडगाव गोवा येथील कोकण रेल्वे मैदानावर पार पडलेल्या एक्सपोजर चषक अखिल भारतीय 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने गोव्याच्या बलाढ्या आरसीसी नॉर्थ संघाचा 31 धावांनी पराभव करून एक्स्पोजर चषक पटकावला. फरहान शेखला सामनावीर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तेजस यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून आरसीसी नॉर्थ संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. याचा पूर्ण फायदा उठवताना बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 5 बाद 120 धावा अशी समाधानकारक धावसंख्या रचली. फरहान शेख 26, समर्थ चौगुले 20, शाहरुख धारवाडकर 16, तेजस व्ही 12 व मोहम्मद हमजा 11 धावा केल्या. गोवा संघातर्फे शौर्य चोडणकर, सनरीत गावडे व दक्ष यांनी प्रत्येकी एक गडी बाद केल्या. प्रत्युत्तरादाखल गोव्या संघाचा डाव युनियन जिमखानाच्या फिरकी गोलंदाजीपुढे गडगडला. त्यांना 20 षटकात 8 बाद 89 धावांपर्यंत मजल मारता आली. आदिप मिस्किन 35 व शौर्य चोडणकर 14 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे फरहान शेख 3 तर तेजस व्ही याने 2 गडी बाद केले.

फरहान शेख सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज ठरला तर तेजस याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, भाई नाईक, रवींद्र नेवगी व ज्येष्ठ प्रशिक्षक हेमंत अंगले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. विजयी संघाला प्रशिक्षक मिलिंद चव्हाण, गौतम शेणवी व सचिन साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले तर अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सचिव प्रसन्ना सुंठणकर यांचे प्रोत्साहन लाभले.
विजयी युनियन जिमखाना संघात कर्णधार मोहम्मद हमजा, सुरज सक्री, मोहम्मद अब्बास, अनिश तेंडुलकर, फरहान शेख, प्रणव जे, तेजस, अतिथी भोगण, आदित्य हुंबरवाडी, शाहरुख धारवाडकर, समर्थ चौगुले, अर्जुन येळ्ळूरकर यांचा समावेश होता.









