सावंतवाडी / प्रतिनिधी
तुमच्या घरात किती कुटुंब राहतात, कुटुंब प्रमुख कोण आहे अशी माहिती आता घेतली जात आहे . यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय विभागाअंतर्गत देशभरात आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कुटुंब सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय विभागाअंतर्गत सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली या तीन जिल्ह्यांचे कुटुंब सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. या कुटुंब सर्वेक्षण अंतर्गत या तीन जिल्ह्यातील टाऊन विभाग करण्यात आले आहेत. 38 टाऊन विभाग शहर यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून आता डिजिटल मॅप या सर्वेक्षण अंतर्गत तयार केले जात आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ शहरे कौटुंबिक सर्वेक्षण व डिजिटल मॅप साठी निवडण्यात आली आहेत. या आठही शहरांचे कुटुंब सर्वेक्षण व डिजिटल मॅप चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सावंतवाडी ,माजगाव ,बांदा ,कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, कलमठ, मालवण ,ही शहरे निवडण्यात आली आहेत. तेथे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसापासून प्रत्येक वार्ड निहाय कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून दर पाच वर्षांनी कुटुंब सर्वेक्षण आरोग्य सर्वेक्षण रोजगार सर्वेक्षण केले जाते तसेच त्या त्या शहरांचा गावांचा नकाशाही तयार केला जातो.









