रिक्त पदांच्या तुलनेत भरतीचे प्रमाण कमी
बेळगाव : शिक्षक भरतीसाठी सुरू असणाऱ्या कागदपत्र पडताळणीमध्ये बुधवारी मराठी माध्यमाच्या गणित व विज्ञान विषयाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. कन्नड व उर्दू माध्यमांसोबतच बुधवारी मराठी माध्यमाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. राज्यात 13 हजार 551 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने पात्र उमेदवारांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी सध्या प्रत्येक विभागवार केली जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी क्लब रोड येथील कार्यालयात सोमवार दि. 22 पासून ही प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विषयवार तपासणी केली जात आहे. बेळगावमधील अनेक मराठी शाळांमध्ये पदे रिक्त असली तरी मराठी माध्यमाला मात्र मोजक्याच जागा देण्यात आल्या आहेत. बेळगाव व खानापूर तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना दुसरीकडे मात्र शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोजक्याच का होईना, पण जागा तरी भरून घ्या, असे म्हणण्याची वेळ मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर आली आहे. मागील वर्षभरापासून शिक्षक भरती प्रक्रियेला या ना त्या कारणाने ब्रेक लागत होता. अखेर सोमवार दि. 22 पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला सुरुवात झाली. 1:1 या सूत्रानुसार शिक्षक भरती प्रक्रिया घेतली जात आहे. शनिवार दि. 27 पयर्तिं ही प्रक्रिया चालणार आहे.









