बेळगाव ; अन्न व पाण्याच्या शोधात सध्या विजयनगर परिसरात अनेक गाढवं, खेचरं फिरताना दिसत आहेत. परंतु पाणी व अन्न न मिळाल्याने यातील काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे ही गाढवं व खेचरं नेमकी आणून कोणी सोडली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच या गाढवांना सुरक्षितस्थळी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून विजयनगर, विनायकनगर, हिंडलगा परिसरात कोणीतरी 20 ते 25 गाढवं, 10 ते 12 खेचरं आणून सोडली आहेत. शहरी भागात त्यांना खाण्यासाठी अन्न उपलब्ध होत नसल्यामुळे मिळेल त्याठिकाणी पाणी पिऊन दिवस काढत आहेत. या गाढवांच्या अंगावर जखमा असून, त्यातून त्यांना वेदना होत असल्यामुळे ती जिकडे तिकडे सैरभैर फिरत आहेत. याचा नाहक मनस्ताप स्थानिक लोकांना होत आहे. अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मंगळवारी यातील दोन गाढवांचा मृत्यू झाला. परंतु मृत्यू पावलेले गाढवही कोणी काढण्यास तयार नसल्याने विजयनगरमधील एका ख•dयात गाढव पडून होते. यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. अंगावर जखमा असल्यामुळे कोणी अन्न देण्यासही तयार नाही. त्यामुळे या गाढवांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
प्राणी दया संघटनेने पुढाकार घेणे गरजेचे
गाढवं व खेचरं विजयनगर परिसरात सोडली आहेत. सध्या शाळांना सुटी असल्यामुळे शाळकरी मुले गाढवांना वेसन घालून त्यांच्यावरून फिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये दगडांनी गाढवांना मारणे, त्यांच्या तोंडामध्ये दोरी बांधणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे आधीच आजारी असणाऱ्या गाढवांना आणखी वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्राणी दया संघटनेने पुढाकार घेऊन या गाढवांना जीवदान देणे गरजेचे आहे.









