काही जणांकडून चक्क स्मशानभूमी विकण्याच्या हालचाली : कोणत्याही परिस्थितीत जागा देणार नसल्याचा ठाम निर्धार : ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध
वार्ताहर /किणये
नावगे गावची स्मशानभूमी हडप करण्याचा प्रयत्न काही भू-माफियांनी सुरू केला आहे. स्मशानभूमीत जेसीबी लावून खासगी सर्व्हे करण्यात येत होता. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत गावची स्मशानभूमी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही असा ठाम निर्धार गावकऱ्यांनी केला आहे . तसेच गावची स्मशानभूमी कोणीही विकण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. नावगे गावाजवळ डोंगराच्या पायथ्याशी सुमारे आठ एकर इतकी स्मशानभूमीची जागा आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. ती गावातील विविध जाती धर्मांच्या लोकांची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गावकरी या जमिनीचा स्मशानभूमी म्हणून वापर करतात. असे असताना काही जणांनी सदर जमीन विकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचा हा कुटिल ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे स्मशानभूमीची जागा बचावसाठी बुधवारी गावातील नागरिक व महिला स्मशानभूमीच्या ठिकाणी एकत्र जमा झाले होते. गावची स्मशानभूमी विकण्याचे धाडस कोण करत आहे असा सवालही काही नागरिकांनी व जाणकार मंडळींनी यावेळी उपस्थित केला आहे. जनावरांना चरण्यासाठी एकमेव जागा गावातील नागरिकांचा शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. या दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येकाच्या घरात दोन ते चार गाई किंवा म्हशी आहेत. गावातील जनावरे याच स्मशानभूमीत चरण्यासाठी सोडण्यात येतात. जनावरांना चरण्यासाठीची ही एकमेव जागा असल्याची माहिती वडीलधारी मंडळींनी यावेळी दिली. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी या स्मशानभूमीच्या जागेवर काही जणांनी जेसीबी लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गावातील पंचमंडळी व ग्रामस्थांनी विरोध करून त्या जेसीबीच्या चालकांना परत माघारी पाठवून दिले होते.
अधिकाऱ्यांना धारेवर
मंगळवारी व बुधवारी पुन्हा काही खासगी अधिकारी सर्व्हे करण्यासाठी स्मशानभूमीत आले होते. त्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले व आमच्या गावची स्मशानभूमी आहे. ती तुम्ही कोणाला विचारून विकण्याचा प्रयत्न करीत आहात, अशी विचारणा केल्यानंतर सदर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. सदर स्मशानभूमीची कोणीही विक्री करू नये असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
किणये ग्रामपंचायत, वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन
स्मशानभूमी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. किणये ग्रामपंचायत, वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ग्रामस्थांच्यावतीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. बुधवारी सकाळी यल्लाप्पा पाटील, लक्ष्मण कामती, रामा गवळी, मारुती हुरकाडली, आनंद तळवार, तानाजी गुरव, नागाप्पा तुर्केवाडी, मधुकर सुतार, लक्ष्मण पाटील, विजय चिगरे, मारुती उंबरवाडी, कल्लाप्पा चिगरे, सूर्यकांत कर्लेकर, संभाजी गुरव, तानाजी गुरव, खाचू हुरकाडली, सातेरी कामती, देवाप्पा गुरव, परशराम हुरकाडली, रामलिंग चिगरे, आपुणी पाटील, मधु पाटील, विश्वनाथ सुतार, संजय तळवार, भोमाणी गुरव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागेवर कोणीही हक्क गाजवू नये

स्मशानभूमीची जागा ही कुरुंदवाडकर सरकार स्थापनेपासून गावकऱ्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेवर कोणीही आपला हक्क गाजवू नये. या स्मशानभूमीबद्दल कोणीही व्यवहार करू नये सर्व समाजातील लोकांसाठी ही स्मशानभूमी असून या स्मशानभूमीच्या रक्षणासाठी आम्ही गावकरी मोठे आंदोलन छेडणार आहे.
-यल्लाप्पा पाटील
स्मशानभूमी हडप केल्यास मोठी समस्या

आम्ही लहानपणापासून बघतोय ही स्मशानभूमी गावातील विविध जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. गावची स्मशानभूमी हडप केल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. गावच्या नागरिकांचा विचार करून असा कोणीही गैरप्रकार करू नये अशी आमची मागणी आहे.
-सुजाता कर्लेकर
गावच्या हितासाठी स्मशानभूमी अबाधित ठेवा

शेकडो वर्षापासून ही गावची स्मशानभूमी आहे. येथे गावातील जनावरेही चरण्यासाठी येतात. त्यामुळे स्मशानभूमीचा दुहेरी फायदा आहे. कोणीतरी स्मशानभूमीचा गैरप्रकारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही केवळ आणि केवळ गावकऱ्यांचीच जमीन आहे. याचा विचार करून गावच्या हितासाठी सदर स्मशानभूमी अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-मारुती हुंबरवाडी









