वृत्तसंस्था/ मुंबई
केपटाऊन येथे 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर प्रथमच भारतीय महिला क्रिकेट संघ जूनमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने होतील. त्यानंतर काही टी20 सामने होतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
संघ सध्या बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दौरापूर्व शिबिरात सहभागी झालेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय महिला संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक शोधण्याची बीसीसीआयची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. असे असले, तरी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू हृषिकेश कानिटकर, जो महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे, तोच बांगलादेश दौऱ्यावर संघाचा प्रमुख म्हणून जबाबदारी हाताळेल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.









