वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किर्गीजस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या तिसऱ्या रँकिंग सिरीज काबा उलू कोझोमकुल आणि रातबेक सनतबाएव्ह कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवी कुमारच्या नेतृत्वाखाली 30 मल्लांसह भारतीय पथक रवाना होण्यास सज्ज झाले आहे.
केंद्र सरकारने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा 82 लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. या खर्चात हवाई प्रवास, स्थानिक वाहन खर्च, भोजन, निवास खर्च यांचा समावेश आहे. भारतीय पथकात एकूण 46 मल्लांचा समावेश असून त्यात 11 फ्रीस्टाईल, 10 ग्रीको रोमन, 9 महिला मल्ल व 16 प्रशिक्षक व सहायक स्टाफचा समावेश आहे. 1 ते 4 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून मल्लांना महत्त्वाचे मानांकन गुण मिळणार असून पुढील स्पर्धांसाठी मानांकन ठरविण्यासाठी त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धाही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असून रँकिंग गुणांद्वारे मिळविलेले सीडिंग महत्त्वाचे भूमिका बजावणार आहे. तिसऱ्या रँकिंग सिरीज स्पर्धेत 400 हून अधिक मल्ल सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेसाठी बलाढ्या पथक पाठवणार आहे. या खेळाडूंत टोकियो ऑलिम्पिक रौप्यविजेता रवी कुमार, आशियाई चॅम्पियन अमन, दीपक पुनिया यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय खेळाडू : फ्रीस्टाईल-अमन, रवी कुमार, पंकज, अनुक कुमार, मुलायम यादव, यश, दीपक (79), दीपक पुनिया, जाँटी कुमार, दीपक (97), अनिरुद्ध कुमार. महिला-नीलम, पूजा, सितो, सरिता, सोनम, मनीषा, निशा, रीतिका, प्रिया. ग्रीको रोमन-मनजीत, सुमित, नीरज, आशू, विकास, साजन, रोहित दाहिया, सुनील कुमार, नरिंदर चीमा, साहिल.









