गांजे गावाचे पाण्यासाठी प्रचंड हाल

उसगांव : उसगांवातील गांजे गावातून नदी वाहते. ओपा पाणी प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी गावातील नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. शिवाय जलशुद्धीकरण प्रकल्पही गावातच आहे. मात्र दुर्दैव असे की उत्तर गोव्याला ज्या गावातून पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे, तेच गांजे गांव मागील पाच दिवस पाण्यासाठी हाल सोसत आहे. ‘धरण उशाशी व कोरड घशाशी’ अशी एकंदरीत या गावातील लोकांची स्थिती बनली आहे. उसगांव गांजे पंचायतीचे सरपंच नरेंद्र गांवकर हे याच प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. संपूर्ण गांजे गाव पाण्यासाठी वणवण करीत असताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मात्र वारंवार विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी सरपंचांना उचलावी लागली आहे.
पाणी विभागाचे अधिकारी दाद देईनात
सरपंच नरेंद्र गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गांजे गावातील पाणी टंचाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गांजे गावातून वाहणाऱ्या नदीचे पाणी गोव्याच्या इतर भागात पुरविले जाते. गावात नदी असूनही ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. जनतेला सेवा देण्यास सरकारी अधिकारी असे बेजबादार वागू लागले तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न सरपंच गांवकर यांनी उपस्थित केला आहे.
पाण्याविना बागायती करपल्या
सरकारी नोकरीच्या मागे न लागता गांजे गावातील काही तरुणांनी बागायतीमध्ये लक्ष घातले आहे. केळी, सुपारी, नारळ व अन्य पीक घेऊन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पाणीच नसल्याने त्यांच्या बागायती आता सुकु लागल्या आहेत. जेथे माणसांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागते, तेथे बागायती व जनावरांची स्थिती केवढी बिकट असेल याची कल्पनाच करावी लागेल.









