उटाच्या प्रकाश वेळीप यांची माहिती
पणजी : 2011साली बाळ्ळी येथे झालेल्या आंदोलनात स्व. मंगेश गावकर आणि स्व. दिलीप वेळीप यांनी बलिदान दिले. त्याची आठवण म्हणून आदिवासी कल्याण संचालनालय आणि उटातर्फे दि. 25 रोजी प्रेरणा दिन मडगाव येथील रवींद्र भवनात सकाळी 9.30 वा. पासून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती उटा संघटनेचे प्रकाश वेळीप यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आदिवासी कल्याण संचालनालयाचे संचालक दशरथ रेडकर, उपसंचालक विरा नाईक, माजी समाजकल्याण खात्याचे संचालक व लेखक प्रतापसिंह काणकर उपस्थित होते. दरवर्षी उटा संघटनेतर्फे प्रेरणा दिन साजरा केला जात होता. परंतु 2017सालापासून आदिवासी कल्याण खात्यातर्फे आणि उटा संघटनेतर्फे प्रेरणा दिन साजरा केला जातो. दि. 25 रोजी होणाऱ्या प्रेरणा दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, अनुसूचित जमातीचे आयुक्त दीपक करमळकर, अनुसूचित जमाती महामंडळाचे संचालक वासुदेव गावकर व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. शंभू घाडी, उमेश गावकर, कल्पेश मोगावकर, गोकुळदास घाडी या चार जणांना प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, 1 लाख असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. याशिवाय आदिवासी कल्याण खात्याच्या विविध योजनांच्या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. प्रतापसिंह काणकर यांच्या ‘लोककल्याणकारी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती वेळीप यांनी यावेळी दिली.









