पुणे / प्रतिनिधी :
महाविकास आघाडीची पुण्यात होणारी वज्रमूठ सभा रद्द झाली आहे. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी रणनीती आणखी आहे. महापालिकेतील टेंडर राज आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात 16 जून रोजी महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात आहे. मात्र, पुणे महापालिकेत टेंडर राज बोकाळले आहे. विशिष्ट ठेकेदार चालवित असलेली पुणे महापालिका आणि प्रशासन यांच्या कारभाराविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या वतीने 16 जून रोजी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
महापालिकेतील ठेकेदार व प्रशासन यांचा भ्रष्टाचार वाढला असून, यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. ठरावीक लोकांसाठीच निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाल महालपासून 11.30 वाजता या मोर्चाला सुरवात होणार असून, महापालिका भवनासमोर मोर्चाची सांगता होईल. यानंतर महापालिकेसमोरच होणाऱया सभेत तिन्ही पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.








