खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : जिल्ह्यात170 केंद्रांतून उद्यापासून बियाणांची होणार विक्री
बेळगाव : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात होणार असल्याने बी-बियाणांचा साठा करण्यात आला आहे. 170 केंद्रांतून 25 मेपासून बी-बियाणांची विक्री केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. खरीप पेरणीबाबत बी-बियाणे उपलब्ध करणे, तसेच खते उपलब्ध करणे याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना केली होती. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना बी-बियाणे वितरणाबाबत नियोजन करा आणि वितरण करा, अशी सूचना केली आहे. बी-बियाणे विक्रीसाठी कृषी संपर्क केंद्रे स्थापन केली आहेत. जिल्ह्यामध्ये 35 शेतकरी संपर्क केंद्रे आणि 135 अतिरिक्त वितरण केंद्रांद्वारे बी-बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये आवश्यक असलेल्या खतांचा साठा सध्या बऱ्यापैकी उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा तो उपलब्ध करण्यासाठी नियोजन करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अतिवृष्टी तसेच इतर कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्याबाबत निवारण पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत पाऊल उचलले जाणार असल्याचे ते म्हणाले. सध्या झालेल्या पावसामुळे काही भागामध्ये नुकसान झाले आहे. त्याची 24 तासांच्या आत चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. पशुंची जीवितहानी झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई द्या, असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
धोकादायक शाळांची तातडीने दुरुस्ती करा
पावसाळा सुरू होत असल्याने धोकादायक असलेल्या शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. जीर्ण इमारती असल्यास पर्यायी व्यवस्था करा. कोणत्याही प्रकारे मुलांना धोका होऊ नये याबाबत काळजी घ्या. पावसाळ्यामध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या कचराकुंडांची स्वच्छता करा. जेणेकरून पाण्याबरोबर कचरा वाहून जाणार नाही, याची काळजी घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रांताधिकारी बलराम चव्हाण, बैलहेंगलचे प्रांताधिकारी प्रभावती, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह कृषी, फलोत्पादन, पाटबंधारे, अन्न व नागरी पुरवठा खाते, पशु संवर्धन, आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पूल, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या
धोकादायक पूल तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलावे. कोणत्याही प्रकारची आपत्ती घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. धोकादायक पूल असल्यास त्याठिकाणी फलक लावून जागृती करणेही गरजेचे आहे. क्षमतेपेक्षा अधिक साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टिनेही साऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे. दरम्यान तलाव, जलाशयांनी धोकादायक पातळी गाठल्यास त्यामधील पाणी विसर्ग करणे महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देऊन तातडीने त्यामधील पाणी सोडावे. जेणेकरून धोका निर्माण होणार नाही याबाबतदेखील सर्वांनी काळजी घ्यावी, असे सांगितले.









