नगरसेवकांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन : बीव्हीजी कंपनीच्या चालढकल वृत्तीमुळे नाराजी
बेळगाव : शहरातील कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या चालढकल वृत्तीमुळे शहर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीव्हीजी कंपनीला यापूर्वी दोन नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु कंपनीने प्रतिसाद दिला नाही. आता तिसरी नोटीसही देण्यात आली असून कंपनीकडून उत्तर न आल्याने शहर स्वच्छतेचे काम ठप्प झाले आहे. मान्सूनपूर्वी याबाबत त्वरित निर्णय घ्यावा आणि शहर स्वच्छतेचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला द्यावे, असे निवेदन वॉर्ड क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे आणि अन्य मराठी नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहर स्वच्छता कामाचा ठेका देण्यासाठी एप्रिल 2022 मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यावेळी बीव्हीजी कंपनीची एकच निविदा दाखल झाली. बराच विचार विनिमय झाल्यानंतर डिसेंबरमध्ये या कंपनीच्या निविदेला सरकारने मंजुरी दिली. ठेका स्वीकारण्यास कंपनीने मान्यता दिल्यानंतर महापालिकेकडून कंपनीला तसे पत्र देण्यात आले. परंतु त्यासाठी कंपनीला 1 कोटी रुपये अनामत रक्कम ठेवण्यास सांगण्यात आले. तथापि, कंपनीने त्याला कोणताच प्रतिसाद न दिल्याने मनपाने दुसरी नोटीस बजावली.
बीव्हीजी कंपनीने घरोघरी असणाऱ्या कचऱ्याची उचल करणे, कोठेही ब्लॅक स्पॉट न ठेवणे, पौरकार्मिक स्वच्छता कामगार, वाहनचालक उपलब्ध करणे, कचरा उचल करण्यासाठी पुरेशा वाहनांची सोय करणे, दररोज व्यावसायिक कचराही वेळेवर उचलणे, उपनगरांतील कचऱ्याचीही उचल करणे, अशा जबाबदाऱ्या कंपनीकडे देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कंपनीने कामाला सुरुवात तर राहोच परंतु मनपाच्या नोटिसीला उत्तरही दिलेले नाही. या सर्व कारभारामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महानगरपालिकेकडे चौकशी करता कंपनीला तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे आणि कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा केली जात आहे, असे महानगरपालिकेचे कर्मचारी सांगत आहेत. पावसाळा सुरू होणार असल्याने लवकरात लवकर तुंबलेल्या गटारी, ड्रेनेज पाईपलाईन यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. तेव्हा याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली भातकांडे व शिवाजीनगरचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी निवेदन दिले आहे.









