वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव-कंग्राळी खुर्द या मुख्य रस्त्याच्या मार्कंडेयनगर क्रॉस आणि रामनगर दुसरा क्रॉसजवळ कचराकुंड्या ठेवाव्यात, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी कचराकुंड नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी याठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या परिसरातील नागरिक आपल्या घरातील केरकचरा या पुंड्यांमध्ये टाकत असत त्याची उचल वेळेवर होत होती. मात्र दोन वर्षांपासून या ठिकाणच्या कचरा कुंड्याच गायब झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घरातील केरकचरा प्लास्टिक पिशवीत घालून याठिकाणी टाकत आहेत. कचरा कुंड नसल्यामुळे येथे भटकी कुत्री, डुकरे खाद्य शोधताना हा कचरा सर्वत्र पसरवत आहेत. शिवाय काही बेजबाबदार नागरिक कचरा कुंड्या नसल्याने रस्त्याच्या पश्चिमेकडच्या बाजूला नाल्यामध्ये टाकत आहेत. त्यामुळे सर्वत्र कचराच कचरा दिसत आहे. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्ता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी या रस्त्यांचे रुंदीकरण आणि पथदीप बसवून सुशोभिकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी पदपथही तयार करण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र कचऱ्यामुळे याठिकाणी विद्रुपीकरण झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी कचरा उचलण्याची गरज
बेळगाव-कंग्राळी खुर्द या मुख्य रस्त्याच्या शेजारील पश्चिमेकडच्या बाजूला रामदेव गल्ली क्रॉस ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संरक्षण भिंतीपर्यंतच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. काही वेळेला या कचऱ्याला आग लावली जाते.









