अनेक झाडे उन्मळून पडली, वाहनांना मोठा त्रास : रस्त्यावरील झाड न हटविल्याने मोठी समस्या
वार्ताहर /कडोली
कडोली परिसरात सोमवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्याबरोबरच ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह दमदार वळिवाने झोडपले. कडोली, अगसगा, हंदिगनूर, देवगिरी, जाफरवाडीसह परिसरात पावसामुळे मोठा फटका बसला आहे. कडोली रस्त्यानजीक सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे पडलेले झाड मंगळवारी सायंकाळपर्यंत हटविण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून हे झाड ग्राम पंचायत हटविणार की हेस्कॉम? याच विवंचनेत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी पडलेल्या पावसामुळे कडोली परिसरात जनजीवन विस्कळीत झाले. या झालेल्या जोरदार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तसेच कडोली ते कंग्राळी खुर्द या रस्त्यावर अनेक झाडे कोसळली होती. त्यामुळे यातून वाट काढताना अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, कडोली मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. त्यानंतर बाजुनेच वाहने हाकण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सकाळी हे झाड हटवतील, अशी आशा साऱ्यांना होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
जोरदार वारा व गडगडाटासह पावसाला सुऊवात झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाड व फांद्याही उन्मळून पडल्या. यामुळे काही कडोली परिसरात सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर मंगळवारी दुपारनंतर हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती. वीज नसल्याने अनेक ठिकाणी पाणीच सोडण्यात आले नाही. त्यामुळे कधी एकदा वीजपुरवठा सुरळीत होणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कडोली परिसरात पडलेल्या झाडांमुळे बंबरगा, देवगिरी, कट्टणभावी, गुंजेनहट्टी, मण्णिकेरी, केदनूर परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळच्या सत्रात हे झाड हटविण्यात न आल्याने कामगारवर्ग तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सायंकाळपर्यंत हे झाड हटविले नसल्याने कामगारांनीही नाराजी व्यक्त केली. पडलेल्या झाडामुळे वाहने नेताना अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसाला सुऊवात झाल्यानंतर जोरदार वारा, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटामुळे अनेकजण घराबाहेर न पडणेच पसंत केले होते. अनेक जणांनी आपल्या घरांचे दरवाजे बंद केले होते. तर कडोली भागात विद्युतपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना दिवे लावून रात्र काढावी लागली होती. याचबरोबर अनेकांचे पत्रे उडून गेले. शिवारात मोठ्याप्रमाणात झाडांच्या फांद्या कोसळल्या होत्या. मंगळवारी सकाळी ते काढण्यासाठी शेतकरी शेताकडे गेले होते. काही पिकांनाही फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान कडोलीत वळिवाचा मोठा फटका बसला.
वळीव पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा : पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

धामणे : यंदा वळीव पावसाचे प्रमाण अल्पप्रमाणात असले तरी धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, नागेनहट्टी या भागात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवस वळीव पाऊस चांगलाच पडल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या वळीव पावसामुळे या भागातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या शेतातल्या कामांना जोर आला आहे. धामणे येथील शेतकरी शेतातील पेरणीपूर्व मशागत, कुळविणे, हेंडोरे मारणे, शेताच्या बांधाची बांधणी करणे या कामांना जोर आला आहे. बैलजोड्यांची किंमत भरमसाठ वाढल्याने जवळजवळ सर्वच शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील मशागतीची कामे करून घेत आहेत. नंदिहळ्ळी भागातील शेतकरी आपल्या शिवारात ऊस पिकाची लागवड जास्त प्रमाणात करण्यात आली असून भात पिकासाठी मोजकीच शेती असल्याने येथील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. त्याचप्रमाणे देसूर येथील शेतकऱ्याचा विटांचा व्यवसाय मोठा आहे. वळीव पाऊस झाल्याने येथील शेतकरी विटा काढण्याचा व्यवसाय बंद करून शेतीची मशागतीची कामे करतात. यंदा देसूर भागाला वळीव पाऊस उशिरा झाला. त्यामुळे वीट व्यवसाय बऱ्यापैकी झाल्याचे येथील वीट व्यवसायधारकांकडून सांगण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी या भागात वळीव पाऊस झाला असल्याने आता पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राजहंसगड व नागेनहट्टी येथील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्रापासून धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, नागेनहट्टी भागातील शेतकरी धूळवाफ भातपेरणी सुरू करण्याच्या तयारीत आहेत.









