वाहनचालकांना त्रास : संबंधितांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर / उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील उचगावनजीक, बेळगुंदी फाट्याजवळील नाल्याच्या शेजारील रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचा डेपो निर्माण झाल्याने या ठिकाणी भटकी कुत्री, मांजरे आणि पक्षी यांच्यामुळे सदर भाग हा दुर्गंधीमय बनला असून भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक वाहनचालकांना होत असल्याने यावर संबंधितांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिक आणि प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले हा संपूर्ण मार्ग अतिशय रहदारीचा मार्ग असून या मार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. बेळगुंदी फाट्यानजीक नाल्याजवळ, नाल्याच्या दुतर्फा अनेक नागरिकांनी अक्षरश: कचऱ्याचा डेपोच निर्माण केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये कचऱ्यासह मेलेली कुत्री, मांजरे, उंदीर, घुशी असे अनेक प्राण्यांचे मृतदेहही टाकण्यात येत असल्याने तसेच या भागातील चिकन सेंटरमधील टाकाऊ कोंबड्यांचा पदार्थ टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सदर कुत्री रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला सारखी ये-जा करत असल्याने रात्रीच्या अंधारात कुत्र्यांचा अंदाज दुचाकी वाहनचालकाला येत नसल्याने, सदर कुत्री वाहनाला आदळून मोठे अपघात सातत्याने या ठिकाणी घडत आहेत. यामध्ये अनेक दुचाकी वाहनचालक जखमी होऊन अनेकांचे हात, पाय फ्रॅक्चर झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. इथून पुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर ठिकाणचा कचरा उचलावा तसेच या ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये. टाकल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशाप्रकारचे फलक लावून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून, प्रवाशांतून होत आहे. बेळगाव बाची या संपूर्ण मार्गावरती जवळपास 25 ते 30 शाकाहारी, मांसाहारी व इतर हॉटेल्स, उपाहारगृह असल्याने याचाही फटका अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यामुळे वाहनचालकांना होतो. यासाठी भागातील हॉटेलमालकांनीही शिल्लक अन्न रस्त्याकडेला टाकू नये, अशी प्रतिक्रिया प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे.









