ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान – खानापूर तालुका पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
खानापूर : आरोग्य हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून मजुरांनी आरोग्याची काळजी घ्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या आरोग्य तपासणी अभियानाची सुरुवात हलशी येथून नरेगा कामाच्या ठिकाणी सोमवारी करण्यात आली. मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना तालुका पंचायत नरेगा सहाय्यक संचालक शेखर हिरेसोमन्नावर यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकास आणि पंचायतराज विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि खानापूर तालुका पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 मे ते दि. 22 जून या कालावधीत ग्रामआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने तालुक्मयातील सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. हलशी ग्राम पंचायतीमधून या मोहिमेला सुऊवात केली असून दररोज दोन ते तीन पंचायतींमध्ये हे शिबिर घेण्यात येत आहे. मजुरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुनाथ दलवाई म्हणाले की, मजुरांना शारीरिकदृष्ट्या कष्टाचे काम करावे लागते. यासाठी पौष्टिक आहारासोबतच योगासने आणि ध्यानधारणा यासारख्या चांगल्या सवयीही लावल्या पाहिजेत. नियमित आरोग्य तपासणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. ग्रामविकास अधिकारी आर. जे. ऊद्रे म्हणाले की, नरेगा योजनेंतर्गत सुरू असलेल्या आरोग्य शिबिरामध्ये मजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेली वैयक्तिक कामे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. रविराजा पै, आरोग्य विभागाच्या कर्मचारी गीता निरलगी, श्रीधरा तम्मनगोळ, महेश सोनटक्की, अस्लम बडेघर, संगिता पालीकर, तपम आयईसी समन्वयक महांतेश जंगटी, प्रशासकीय सहाय्यक गणेश अलबादी, ग्रा. पं. अध्यक्ष मुनेरा सांगोली, ग्रा. पं. सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर्स व मजूर उपस्थित होते.
230 कामगारांची आरोग्य तपासणी
हलशी येथील आरोग्य शिबिरात 230 हून अधिक मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी बीपी, शुगर, अॅनिमिया, टीबी तपासणी व इतर आजारांची तपासणी केली. गरजूंना गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले. पुढील तपासणीसाठी त्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका आरोग्य केंद्राला भेट देण्यास सांगण्यात आले.









