नवी दिल्ली/ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकधारक नीरज चोप्राने विश्व अॅथलेटिक्स संघटनेतर्फे घोषित करण्यात आलेल्या पुरुष भालाफेकधारक जागतिक मानांकनात अग्रस्थान पटकावले आहे.
विश्व अॅथलेटिक्स संघटनेतर्फे सोमवारी घोषित करण्यात आलेल्या जागतिक भालाफेकधारक ताज्या मानांकन यादीत भारताच्या नीरज चोप्राने 1455 मानांकन गुण घेत अग्रस्थान मिळवले आहे. या मानांकन यादीत ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स 1433 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. 30 ऑगस्ट 2022 रोजी भालाफेकधारकांच्या जागतिक मानांकनामध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर होता तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स अग्रस्थानावर होता. अँडरसन पीटर्स हा विद्यमान विश्व चॅम्पियन आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झुरीच येथे झालेल्या डायमंड लिग अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. झुरीचमधील यशानंतर नीरज चोप्राला दुखापतीमुळे काही दिवस अॅथलेटिक्स क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. 5 मे रोजी डोहा येथे झालेल्या डायमंड लिग स्पर्धेत नीरज चोप्राने 88.67 मी. भालाफेक करत पहिले स्थान मिळवले होते तर ग्रेनेडाच्या पीटर्सला या स्पर्धेत 85.88 मी. सह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. भारताचा नीरज चोप्रा आता नेदरलँड्समध्ये 4 जून रोजी होणाऱ्या 2023 च्या एफबीके अॅथलेटिक्स स्पर्धेत तसेच त्यानंतर 13 जून रोजी फिनलँडमधील तुर्कु येथे होणाऱ्या पॅव्हो नुमी अॅथलेटिक्स स्पर्धेत आपला सहभाग दर्शवणार आहे. त्याचप्रमाणे बुडापेस्टमध्ये होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत तसेच हेंगझोयुमधील आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत तो भारताचा प्रतिनिधीत्व करेल.









