उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची पोलीस अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
गुंडगिरी, अनधिकृत कृत्यांना वेळीच चाप लावणे आवश्यक आहे. ड्रग्ज माफियांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कार्यतत्परता दाखविली पाहिजे, अशी सूचना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसौधमध्ये बोलावलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात घडणाऱ्या अनधिकृत कृत्यांना चाप लावणे आवश्यक आहे. गुंडगिरी करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांचा मुलाहिजा न ठेवता बेधडक कारवाई करावी. ड्रग्ज माफियांना कोणताही वाव मिळणार नाही, यासाठी यंत्रणा दक्ष असणे गरजेचे आहे. पोलीस स्थानकात तक्रारी घेऊन येणाऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका. त्यांच्या समस्या जाणून घ्या, पोलीस खात्याविषयी जनतेत विश्वास निर्माण झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
पोलिसांच्या वर्तणुकीवर ताशेरे
मागील सरकारच्या काळात पोलिसांचे वर्तन कसे होते, यावर आपण बारकाईने लक्ष ठेवले होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिद्धरामय्या आणि मला अशी वाईट वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय?, असा प्रश्न शिवकुमार यांनी केला. आपल्याविरुद्ध असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना मात्र मोकाट सोडण्यात आले. टिपू सुलतानला ज्या पद्धतीने संपविण्यात आले, त्याप्रमाणेच सिद्धरामय्यांना संपविण्याची भाषा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी केलेला गुन्हा नव्हे का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
पोलीस खात्याची प्रतिमा स्वच्छ बनली पाहिजे
पीएसआय नेमणुकीतील गैरव्यवहारात एक एडीजीपी ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यापर्यंत पोहोचले. याचाच अर्थ पोलीस खाते कोणत्या स्तराला पोहोचले, हे दिसून येते. पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहार उघड करणाऱ्यांनाच त्रास देण्यात आला आहे. प्रियांक खर्गे यांना विनाकारण त्रास देण्यात आला आहे. संपूर्ण देण्यात राज्य पोलीस खात्याचा नावलौकिक होता. ही प्रतिष्ठा गमाविण्यास पोलीस अधिकारीच कारणीभूत आहेत. भ्रष्टाचारानेही खात्याला पोखरले आहे. आपल्या सरकारमध्ये पोलीस खात्याची प्रतिमा स्वच्छ बनली पाहिजे. तुमच्या वर्तनात बदल झाला पाहिजे. अन्यथा तुम्हालाच बदलण्यात येईल, असा इशारावजा संदेशही डी. के. शिवकुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला.
पोलीस खात्याच्या भगवेकरणाला वाव नाही!
पोलीस खात्याचे भगवेकरण करण्यास निघाला आहात का?, असा परखड प्रश्न उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केला आहे. आपल्या सरकारमध्ये अशा कृत्याला वाव मिळणार नाही. मंगळूर, विजापूर, बागलकोटमध्ये तुम्ही खांद्यावर भगवा शेला घालून खात्याचा अवमान केला आहात, याची जाणीव आहे का?, या बैठकीत देखील शेला घालून यायला हवे होते. देशाविषयी अभिमान असेल तर राष्ट्रध्वजाचा वापर केला असता, अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.









