अध्यादेशाचा मुद्दा : काँग्रेसने मात्र अंग झटकले
वृत्तसंस्था/ कोलकाता
दिल्लीत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदली-नियुक्तीचे प्रकरण तापले आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षाने देशव्यापी समर्थन जमविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी मंगळवारी पश्चिम बंगालचा दौरा केला. आप नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेत समर्थन मागितले. ममतादीदींनी याप्रकरणी ‘आप’ला पाठिंबा दर्शविला आहे. तर काँग्रेसने मात्र या पूर्ण वादापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे.
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ स्थापन करण्याचा अध्यादेश आणला आहे. या अध्यादेशाला कायदेशीर चौकट मिळवून देण्यासाठी 6 महिन्यांच्या आत याविषयीच्या विधेयकाला संसदेची संमती मिळवावी लागणार आहे. दिल्लीमधील केजरीवाल सरकार विरुद्ध उपराज्यपाल या संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. यात राज्य सरकारला अधिकाऱ्यांची बदली-नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
अहंकारालाही मर्यादा असते : ममतादीदी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात आणलेल्या अध्यादेशाला आम्ही विरोध करणार आहोत. याप्रकरणी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट व्हावे असे आवाहन करते. आम्ही सर्वजण मिळून भाजपला राज्यसभेत पराभूत करू शकतो. अहंकाराला देखील एक मर्यादा असते, स्वत:च्या मर्जीत येईल ते कसे काय करू शकतात? आता आम्हाला घटनाच बदलली जाईल का याची चिंता सतावू लागली आहे. आज जर आम्ही सावध झालो नाही तर लोक आम्हाला माफ करणार नाहीत असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
यंत्रणांचे सरकार
मणिपूरमध्ये आता दररोज रक्त सांडत आहे. परंतु भाजपला तेथे जात लोकांना भेटण्यासाठी वेळच मिळत नसावा. भाजपचे लोक उद्या कुणाच्या घरावर ईडीची धाड पडणार हे सांगत आहेत. भाजपच्या कनिष्ठ स्तरावरील कार्यकर्त्यालाही ईडीच्या कारवाईची पूर्वकल्पना असते. हे सरकार ‘यंत्रणांचे, यंत्रणांद्वारे चालविले जाणारे अन् यंत्रणांसाठी’चे ठरल्याची टीका ममतादीदींनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडूनच आशा
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो आणि केवळ सर्वोच्च न्यायालयच या देशाला वाचवू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन करते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
अहंकारी सरकार हटवावे : केजरीवाल
पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडूत राज्यपाल सरकारला त्रास देत असल्याचे आम्ही पाहिले आहे. दिल्लीत केंद्र सरकारने केलेले कृत्य लोकशाहीच्या विरोधात आहे. देशाच्या जनतेने या अहंकारी सरकारला हटवावे. राज्यसभेत ममता बॅनर्जींचा पक्ष आम्हाला समर्थन देणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
अद्याप निर्णय नाही : काँग्रेस
काँग्रेस पक्षाने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणले गेलेल्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर कुठलाच निर्णय घेतलेला नाही. स्थानिक नेते आणि समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत यासंबंधी आम्ही विचारविनिमय करणार आहोत असे काँग्रेसचे महाचिव के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले आहे. 1952 नंतरपासून दिल्ली सरकारकडे बदली-नियुक्तीचा अधिकार नाही. लालबहादुर शास्त्राr पंतप्रधान असताना त्यांनी सर्व बदली-नियुक्तीचे अधिकार केंद्र सरकारकडे हस्तांतरित केले होते. प्रत्येक पंतप्रधानाने असेच पाऊल उचलले आहे. प्रत्येक जण चुकीचा आणि केवळ अरविंद केजरीवालच योग्य आहेत का? आप नेत्यांना आता आपण अडकण्याची चिंता सतावू लागल्याचे काँग्रेस नेते अजय माकन यांनी म्हटले आहे.









