दिल्लीची इशिता किशोर देशात प्रथम, पहिले चार क्रमांक महिलांनाच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेमध्ये पहिले चार क्रमांक पटकावून महिलांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दिल्ली विद्यापीठाची पदवीधर इशिता किशोर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर बिहारच्या गरीमा लोहियाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. हराथी एन. आणि स्मृती मिश्रा यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकाविला.
महिला परीक्षार्थींनी पहिले तीन क्रमांक पटकाविलेले हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे पहिले तींन क्रमांक मिळविले होते. यंदाच्या परीक्षेत एकंदर 631 पुरुष आणि 320 महिला अशा 933 परीक्षार्थींनी यश संपादन केले आहे. तर पहिल्या 25 क्रमांकापैकी 14 क्रमांक महिलांनी तर 11 क्रमांक पुरुषांनी मिळविले.
राज्यशास्त्र हा प्रमुख विषय
यंदा प्रथम क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इशिता किशोर हिने या परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा प्रमुख तर आंतरराष्ट्रीय संबंध हा पर्यायी विषय निवडला होता. तिने आपली पदवी अर्थशास्त्र (ऑनर्स) या विषयात दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या श्रीराम महाविद्यालयातून घेतली आहे. दुसरा क्रमांक मिळविलेली आणि मूळची बिहारची असलेली गरीमा लोहिया हिने दिल्ली विद्यापीठातूनच कॉमर्स शाखेत पदवी मिळविली असून या परीक्षेला तिचा मुख्य विषय कॉमर्स तर पर्यायी विषय अकाऊंटन्सी हा होता. तिसरा क्रमांक पटकाविलेली हराथी एन. ही हैदराबादची असून तिने हैदराबाद येथील आयआयटीतून सिव्हील इंजिनिअरिंगची बी. टेक. ही पदवी घेतली आहे. तिने या परीक्षेला पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र (अंथ्रॉपोलोजी) या विषयाची निवड केली होती. चौथा क्रमांक मिळविलेली स्मृती मिश्रा ही दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने विज्ञान विषयात पदवी घेतली आहे. तिने या परीक्षेला पर्यायी विषय प्राणीशास्त्र हा निवडला होता. पहिल्या 25 क्रमांकांमध्ये अधिकतर परीक्षार्थी विज्ञान आणि इंजिनिअरिंग या शाखांचे पदवीधर आहेत.
परीक्षा कशी घेतली जाते…
भारतातील ही सर्वात प्रतिष्ठेची मानली गेलेली लोकसेवा आयोग परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्राथमिक आणि मुख्य या दोन परीक्षा लेख असतात तर मुलाखत हा शेवटचा टप्पा असतो. ही परीक्षा आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या तीन महत्वाच्या सेवांसाठी लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते. ही परीक्षा देणारा उमेदवार पदवीधर असावा लागतो, अशी माहिती देण्यात आली.
11 लाखांहून अधिक उमेदवार
यंदाच्या परीक्षेचा पहिला टप्पा 5 जून 2022 या दिवशी घेण्यात आला होता. त्या परीक्षेला देशभरातून 11,35,697 विद्यर्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांच्यापैकी प्रत्यक्षात 5,73,735 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. त्यांच्यापैकी 13,090 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यांच्यापैकी 2,529 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली होती, अशीही माहिती देण्यात आली.









