समुद्राच्या पृष्ठभागावरून तरंगत्या लक्ष्याला भेदले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय नौदलाची विध्वंसिका ‘आयएनएस मोरमुगाओ’वरुन मंगळवारी नव्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. हे एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून त्याद्वारे समुद्रात तरंगत्या लक्ष्याचा भेद करण्यात आला आहे. या प्रकाराला सी स्किमिंमग म्हटले जाते. या परीक्षणाला भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल ठरविले आहे.
यापूर्वी 14 मे रोजी मोरमुगाओवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले होते. आयएनएस मोरमुगाओचे डिझाइन भारतीय नोदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने तयार केले आहे. भारतीय नौदलाची ही शस्त्रास्त्रांनी युक्त सर्वात आधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे. या युद्धनौकेवरून 300 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा भेद करता येऊ शकतो.
सी स्किमिंग म्हणजे काय?
सी स्किमिंग उड्डाणाची एक पद्धत असून यात एखादे क्षेपणास्त्र किंवा विमान पाण्याच्या पृष्ठभागाच्या अत्यंत जवळून उ•ाण करते, सर्वसाधारपणे 10 फुटांपेक्षा कमी उंचीवर. या तंत्रज्ञानाचा वापर सैन्य आणि नागरी दोन्ही उद्देशांसाठी केला जातो. काही विमानांकडून पाण्यात उतरण्यासाठी आणि त्यावरून उड्डाण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
मोरमुगाओ युद्धनौका
ब्राह्मोस आणि आता सी स्किमिंग क्षेपणास्त्राच्या यशस्वी परीक्षणानंतर मोरमुगाओ युद्धनौका आता आणखी घातक झाली आहे. ही युद्धनौका 18 डिसेंबर 2022 रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. या युद्धनौकेची लांबी 163 मीटर तर रुंदी 17 मीटर आहे. तर याचे डिस्प्लेसमेंट 7,400 टनांचे आहे. आयएनएस मोरमुगाओ एक स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर असून याचा 75 टक्के हिस्सा देशातच तयार करण्यात आला आहे. भारतीय नौदलुनसार ही पी-15 ब्राव्हो प्रोजेक्टमधील दुसरी युद्धनौका आहे. पी-15बी प्रकल्पाच्या अंतर्गत 4 युद्धनौका निर्माण केल्या जात आहेत. यातील विशाखापट्टणम आणि मोरमुगाओ या युद्धनौका नौदलाला सोपविण्यात आल्या आहेत.









