अंबाला ते चंदीगडपर्यंत ट्रक यात्रा : चालकाशेजारी बसून साधला संवाद
वृत्तसंस्था/ चंदीगड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री अंबाला ते चंदीगडपर्यंतचा 50 किलोमीटरचा प्रवास ट्रकमधून केला आहे. राहुल हे सोमवारी दुपारी दिल्लीहून शिमल्यासाठी कारने निघाले होते. परंतु राहुल यांनी वाटेत ट्रकचालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
राहुल गांधी यांनी पहाटे 5.30 वाजता अंबालातील श्री मंजी साहब गुरुद्वारानजीक ट्रक थांबविला, मग गुरुद्वारात जाऊन नमन केल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनी ट्रकमधून केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारतातील रस्त्यांवर सुमारे 90 लाख ट्रकचालक आहेत. या ट्रकचालकांच्याही काही समस्या आहेत. ट्रकचालकांची ‘मन की बात’ ऐकून घेण्याचे काम राहुल यांनी केले आहे. अवजड वाहने चालविणाऱ्या या चालकांना रात्रभर ड्रायव्हिंग करावे लागते. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या जाणून घेण्यासाठीच राहुल यांनी ट्रकचालकांसोबत संवाद साधल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे.
राहुल यांच्या पाठिशी देश
विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी, क्रीडापटूंशी, नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींशी, शेतकऱ्यांशी, डिलिव्हरी पार्टनरांशी, बसमधील सर्वसामान्य नागरिकांशी आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांशी राहुल गांधी अखेर का संवाद साधत आहेत? राहुल गांधी हे देशातील लोकांचे म्हणणे ऐकून घेऊ इच्छित आहेत, सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा राहुल यांचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.
राहुल गांधींना सर्वसामान्यांशी संवाद साधताना एक विश्वास जाणवतो. सर्वसामान्यांसोबत कुणीतरी उभे आहे, सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची राहुल गांधींची तयारी आहे. द्वेषाच्या बाजारात राहुल गांधी हे प्रेमाचे दुकान सुरू करत आहेत. हा देश प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतत असल्याची जाणीव आता जोर पकडू लागली आहे. हा देश आता राहुल गांधी यांच्यासोबत उभा राहतोय, असे श्रीनेत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सोनिया गांधींना भेटण्यासाठी शिमल्यात
राहुल गांधी हे सोनिया गांधींना भेटण्यासाठी शिमला येथे पोहोचले आहेत. सोनिया गांधी सध्या शिमला येथील प्रियांका वड्रा यांच्या फार्महाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांच्या निवडीतील पेच सोडविण्यासाठी सोनिया गांधी यांनी शिमल्यातूनच पुढाकार घेतला होता. प्रियांका यांचे हे फार्महाऊस शिमला शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे.









