ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपुरात आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. नागपूरमधील मनसर येथे उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरुन शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का? असा बोचरा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
अन्य धर्मियांच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशानंतर नितेश राणे यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राणे म्हणाले, आपल्या धर्मामध्ये आरती करणं हा आमचा हक्क आहे, जबाबदारी आहे. धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकलो नाही तर आम्हाला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी महाआरती केली.त्र्यंबकेश्वरमध्ये जो प्रकार घडला ते हिंदू धर्माच्या विरोधात आक्रमण होतं. जे काही हल्ले आमच्या हिंदू धर्मावर होत आहेत, ते थांबवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाआरती केली.
दरम्यान, नागपूरातील मनसर येथे राज्याचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. त्याबद्दल मीडियाने विचारले असता, शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का?, असा बोचरा सवाल करत कार्यकर्त्यांनी विचार करुन बॅनर लावावेत, असे राणे यांनी सांगितले.