पहिल्या दिवशी 128 उमेदवार हजर : सकाळपासूनच उमेदवार-कुटुंबीयांची गर्दी

बेळगाव : पदवीधर शिक्षक भरतीसाठी सोमवारपासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीला सुरुवात झाली. क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच मूळप्रती ठेवून घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी 128 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामुळे जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात पात्र उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी झाली होती. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या 608 पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विषयानुरुप सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. प्रत्येक उमेदवाराला क्रमांक देण्यात आले होते. क्रमांक पुकारल्यानंतरच त्या उमेदवाराला सभागृहात प्रवेश देण्यात येत होता. त्यानंतर तेथे असणाऱ्या पर्यवेक्षकांकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांची गर्दी झाली होती. काही महिला आपल्या तान्हुल्यांना कडेवर घेऊन रांगेमध्ये उभ्या होत्या. बऱ्याच उमेदवारांचे कुटुंबीय आसपासच्या परिसरात दिसून येत होते. कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याने उमेदवारांची मात्र घालमेल तसेच कागदपत्रांची जमवाजमव करण्यामध्ये दमछाक होत होती.
रखरखत्या उन्हातही प्रतिसाद
सोमवारी सकाळी 11 वाजल्यानंतर शहरात रखरखते ऊन पडले होते. वाढत्या उष्म्यातही शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, आयुष्यभराचा प्रश्न असल्याने उमेदवारांनी अत्यंत सोशिकपणा दाखवत या नैसर्गिक परिस्थितीचा सामना केला.









