तीन नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ
► वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात फेरबदल केला. विक्रम केशरी अऊखा, शारदा प्रसाद नायक आणि सुदाम मरांडी या तिघांनी सोमवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. भुवनेश्वर येथील लोकसेवा भवनाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पटनायक यांच्या उपस्थितीत राज्यपाल गणेशीलाल यांनी त्यांना शपथ दिली. यापूर्वी पटनायक यांनी जून 2022 मध्ये आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केला होता.
पटनायक मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि एका मंत्र्याची नुकतीच हत्या झाल्यानंतर फेरबदल करण्यात आले आहेत. ज्येष्ठ आमदार विक्रम केशरी अऊखा, शारदा प्रसाद नायक आणि सुदाम मरांडी यांनी ओडिशाचे नवे मंत्री म्हणून शपथ घेतली. ओडिशाचे माजी आरोग्य मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नाबा किशोर दास यांची यावषी 29 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 12 मे रोजी शालेय आणि जनशिक्षण मंत्री रंजन दास, कामगार आणि कर्मचारी राज्य विमा मंत्री श्रीकांत साहू यांनी राजीनामा दिल्यामुळे पटनायक मंत्रिमंडळातील एकूण आकडा 22 वरून तीन ने कमी झाला होता.









