भारत आमचा नेता असल्याची पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांचे वक्तव्य :
► वृत्तसंस्था/ पोर्ट मोरेस्बी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी पापुआ न्यू गिनीमध्ये फोरफम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड को-ऑपरेशन म्हणजेच एफआयपीआयसीच्या बैठकीत सामील झाले. या बैठकीदरम्यान रिपब्लिक ऑफ पलाऊ आणि फिजी या देशांनी मोदींना स्वत:च्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला आहे. पलाऊने पंतप्रधान मोदींना इबाकल अवॉर्ड तर फिजीने ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी’ पुरस्कार दिला आहे.
जागतिक व्यासपीठांवर भारतीय नेतृत्वासोबत आम्ही उभे राहू. प्रशांत बेटसमुहाच्या देशांना रशिया-युक्रेन युद्धामुळे फटका बसला आहे. भू-राजकारण आणि मोठ्या देशांमधील संघर्षामुळे छोट्या देशांना त्रास सहन करावा लागतो. भारत ग्लोबल साउथ म्हणजेच विकसनशील देश आणि गरीब देशांचा नेता आहे. आम्ही सर्वजण विकसित देशांच्या शक्तीच्या खेळात शिकार ठरलो आहोत असे एफआयपीआयसीच्या बैठकीत पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी म्हटले आहे. तर मारेप यांनी रविवारी पंतप्रधान मोदींच्या स्वागतावेळी चरणस्पर्श केला होता.
ज्यांच्यावर भरवसा ठेवला त्यांनीच..
मरापे यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट नामोल्लेख टाळून विकसित देशांवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव ग्लोबल साउथ म्हणजेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांवर पडला आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उपासमारी आणि गरीबी अशाप्रकारची अनेक आव्हाने पूर्वीपासून होती आणि आता नव्या समस्या उभ्या ठाकू लागल्या आहेत. ज्यांच्यावर भरवसा ठेवला, तेच संकटकाळात आमच्यासोबत उभे नव्हते. तर भारत संकटकाळात प्रशांत बेम्दृश देशांसोबत उभा राहिला. कोरोना लसीद्वारे भारताने सर्व सहकारी मित्रांना मदत केली. भारतासाठी प्रशांत महासागरातील बेटं ही काही छोटे देश नसून मोठे सागरी देश असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
धोरणात्मक भागीदारी वाढविणार
पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान आरोग्य, कौशल्य विकास, गुंतवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी तमिळ भाषेतील पुस्तक ‘थिरुकुरल’च्या तोक पिसिन भाषेमध्ये अनुवादित करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. तोक पिसिन ही पापुआ न्यू गिनीची अधिकृत भाषा आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी योजना
-फिजीमध्ये 100 बेडांचे रिजनल सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल तयार केले जाणार.
-पापुआ न्यू गिनीमध्ये आयटी, सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
-प्रशांत बेटांच्या विविध देशांमध्ये सागर अमृत शिष्यवृत्ती प्रदान करणार.
-शासकीय इमारतींसाठी सौर प्रकल्प, पेयजलासाठी युनिट्स,
-डायलेसिस युनिट, पूर्णवेळ हेल्पलाइन, जनऔषधी अन् योग केंद्र सुरू करणार.
प्रशांत बेटांच्या देशावर चीनचा प्रभाव
पॅसिफिक आयलँडचे देश विकासाच्या अनेक मुद्द्यांवरून अन्य देशांवर निर्भर आहेत. या भागात स्वत:चे प्रभुत्व निर्माण करण्यास चीनने यश मिळविले ओ. एफआयपीआयसीच्या अनेक देशांमध्ये चीनकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पापुआ न्यू गिनीमध्ये चीन एका अत्यंत महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाची निर्मिती करत आहे. हा रस्ते प्रकल्प देशाच्या सर्व भागांना परस्परांशी जोडणारा ठरणार आहे. या प्रकल्पाकरता 47 हजार कोटी रुपये चीनकडून खर्च केले जाणार आहेत. चीनच्या सहकार्याने तेथे एक जलविद्युत प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे.









