सफदरगंज रुग्णालयात दाखल : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात कैद आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सोमवारी सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जैन यांची प्रकृती बिघडल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.
सत्येंद्र जैन हे 31 मे 2022 पासून तुरुंगात आहेत. 6 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जैन यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीचा दाखला दिला होता. जैन यांचे तुरुंगात 35 किलोनी वजन घटले आहे. त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्याचा युक्तिवाद सिंघवी यांनी केला होता.
सत्येंद्र जैन यांच्या उत्तम प्रकृतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. भाजप सरकारचा हा अहंकार आणि अत्याचार दिल्ली आणि देशातील लोक पाहत आहेत. या अत्याचाऱ्यांना देव देखील माफ करणार नाही. या संघर्षात जनता आमच्यासाब्sात आहे. ईश्वर आमच्यासोबत आहे. आम्ही सरदार भगत सिंह यांचे अनुयायी आहेत. अत्याचार, अन्याय आणि हुकुमशाही विरोधातील आमची ही लढाई सुरूच राहणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुटी सुरू झाली आहे. सुटीकालीन खंडपीठासमो याचिका करण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना दिली आहे. न्यायाधीश ए.एस. बोपन्ना आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या याचिकेवर ईडीला नोटीस बजावली आहे.









