ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कार्डेलिया क्रूझवरील कारवाईनंतर एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. याच प्रकरणामध्ये वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 24 मे पर्यंत वानखेडेंना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तसेच, 22 मे पर्यंत त्यांना सीबीआयकडे आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. ही मुदत आज संपली असून, वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी सुरूआहे.
तर दुसरीकडे वानखेडे यांना त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. गँगस्टर आतिक अहमदसारखी माझी परिस्थिती होईल, असा दावा करत वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. 15 एप्रिलला प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेर घटना घडली होती. अशीच घटना माझ्या बाबतीतही होऊ शकते, असे वानखेडे यांनी म्हटले होते.
दरम्यान, ऑगस्ट 2022 मध्ये समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच वानखेडे यांना धमकी देण्यात आली होती. “तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा. तुमको खत्म कर देंगे”, असा धमकीवजा मेसेज वानखेंडेंच्या ट्विटमध्ये आला होता.








