कृष्णात चौगले, कोल्हापूर
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यामध्ये त्यांनी तालुकानिहाय किती कार्यकर्ते उपस्थित आहेत,याची चाचपणी करण्यासाठी चक्क हजेरी घेतली.यामध्ये कोल्हापूर शहरासह शिरोळ,हातकणंगले,पन्हाळा, शाहूवाडी,इचलकरंजी,करवीर,राधानगरी,भुदरगड तालुक्यातील उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती.त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीची ताकद साडेतीन तालुक्यांपुरती मर्यादित असल्याचे अखेर शिक्कामोर्तब झाले असून संबंधित नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मुखवटे उघडे पडले आहेत.यापुढे व्यापक दृष्टीकोनातून जिल्हा आणि शहर राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करण्याचे नेत्यांसमोर आव्हान आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही वापरण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.तरीही महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी स्वबळ वाढविण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. राजकारणात कधी कोणाचा मित्र नसतो,आणि शत्रूही नसतो.राजकारणात कधीही काहीही होऊ शकते,याची जाणिव ठेवून महाविकास आघाडी म्हणून वाटचाल सुरू असताना आपले संख्याबळ कसे वाढवता येईल यासाठी सर्वच घटकपक्ष प्रयत्नशील आहेत.त्याला राष्ट्रवादी काँग्रेसही अपवाद नाही.सध्या जिल्हा राष्ट्रवादीचे चित्र पाहता काही तालुके वगळता ‘राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी स्थिती आहे.अशा परिस्थितीतही अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत.
दिवंगत मंत्री दिग्वीजय खानविलकर यांच्या पश्चात गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी हा कागल,चंदगड आणि राधानगरी या तीन विधानसभा मतदारसंघापुरता ‘लिमिटेड’ पक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले.करवीर, शाहूवाडी, शिरोळ,हातकणंगले,इचलकरंजी,कोल्हापूर उत्तर, दक्षिण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली.अशा परिस्थितीत गटातटाच्या आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीचे सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व दिसत असले तरी त्यांनी इतर पक्षांचा टेकू घेतला होता.त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीमध्ये जिल्हा राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना झगडावे लागणार आहे.
राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-सेना युतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गळती सुरू झाली. राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवरील अनेक कार्यकर्ते भाजपवासी झाले.परिणामी 2017 च्या निवडणुकीमध्ये जि.प.मधील संख्याबळात घट होऊन ते 16 वरून 11 पर्यंत खाली आले. परिणामी पुरेशा संख्याबळाअभावी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुरूवातीची तीन वर्षे सत्तेपासून दूर रहावे लागले. त्यामुळे आगामी जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकीमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी भक्कम करावी लागणार आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या देऊन अंग झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.
नवीन चेहरे पुढे आणण्याचे अप्रत्यक्ष संकेत
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आता भाकरी परतायची आहे, असे स्पष्टपणे नमूद केले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा स्विकारली असली तरी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये निश्चितपणे भाकरी परतण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच जिह्यातील जुन्या चेहऱ्यांना प्रदेश पातळीवर स्थान देऊन जिल्हा पातळीवर नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे धोरण निश्चित केले आहे. पक्षाचे काम न करता जे पदाधिकारी केवळ खुर्ची उबवत आहेत, त्यांना तत्काळ दूर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या 3 ते 4 वर्षात क्रियाशील सभासद नोंदणी नगण्य
जिह्यात गेल्या 3 ते 4 वर्षात क्रियाशील सभासदांची नेदणी अतिशय कमी झाली आहे. यामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला का ? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर ते नकारात्मक येईल. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिह्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी कमकुवत झाली आहे. सद्यस्थितीत पक्षाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून त्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी सुरु आहे. पण बूथ नेंदणीची प्रक्रिया मात्र ठप्प आहे. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम राबविला जात नाही. पक्षाचे बुथ निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे यांनी त्याबाबतचा अहवाल अजित पवार यांच्याकडे सादर केल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीचे नेते उघडे पडले आहेत. त्यामुळेच पवार यांनी कोल्हापूर जिह्यातील संघटनात्मक पातळीवरील भाकरी परतणार असल्याचे स्पष्ट करून गटतटाच्या राजकारणात मग्न असलेल्या नेत्यांना झटका दिला आहे.
येत्या दोन महिन्यात जिल्हा व शहर राष्ट्रवादीची होणार पुनर्बांधणी
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी घेतलेल्या हजेरीत कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांची संख्या 90 टक्क्यांहून अधिक दिसली. हा मेळावा शहरात असला तरी शहरातील कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली. संबंधित पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले असले तरी पवार यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची उणिव भासली. त्यामुळेच पक्षीय निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देऊन शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीची पुनर्बांधणी होणार असून पवार यांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









