धोकादायक फांद्या हटविण्याचे काम हाती : मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटविण्याचे काम मनपा आणि हेस्कॉम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिक आणि विक्रेत्यातून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या पावसाळ्यापूर्वी हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाला वेळीच जाग आल्याचे दिसत आहे. कचेरी रोड येथील गाळ्यांच्या छतावर धोकादायक झाडे आणि फांद्या कलंडल्या होत्या. शिवाय येथूनच विद्युतभारित तार गेली आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. येथील व्यावसायिकांनी तातडीने झाडांच्या फांद्या हटवा, अशी मागणी केली होती. यानुसार रविवारी येथील धोकादायक फांद्या हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ता देखील खुला झाला आहे.
विद्युत तारा-घरांवर झुकल्या फांद्या
शहरात आयुर्मान संपलेल्या कमकुवत झाडांची संख्या अधिक आहे. त्याबरोबर झाडांच्या फांद्यादेखील धोकादायक आहेत. काही ठिकाणी विद्युत तारांवर तर काही ठिकाणी घरांच्या छतावर फांद्या झुकल्या आहेत. त्यामुळे रहिवासी, व्यावसायिक आणि विक्रेत्यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. अशा धोकादायक फांद्या हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून होत होती. वनखाते दरवर्षी लाखो रोपे लावून झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे मात्र अनेक झाडे रहिवाशांना त्रासदायक ठरू लागली आहेत. तर काही धोकादायक स्थितीत आहेत. स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान काही झाडांची मुळे तुटली आहेत. त्यामुळे अशी झाडेदेखील कमकुवत बनली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धोका उद्भवण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने शहरातील धोकादायक फांद्या हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम अधिक तीव्र करून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व धोकादायक झाडे आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी होत आहे.









