जलसाठा वाढविण्यासाठी करताहेत प्रयत्न : उद्योग खात्रीतून अनेक तलावांची खोदाई : जिल्ह्यातील 70 टक्के तलावांमधील पाणी आटले
बेळगाव : राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवासह अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. विशेषकरून जलपातळी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याला उद्योग खात्रीची जोड देण्यात येत आहे. मात्र, म्हणावे तेवढे प्रयत्न अजूनही होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात 200 हून अधिक तलाव कोरडे पडले आहेत. उर्वरित तलावांमध्ये जलपर्णी व गाळ साचल्याने ते पाणी उपयोगी ठरत नाही. जिल्हा प्रशासन आणि तालुका पंचायतीच्या माध्यमातून जलपातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध गावांतील नद्या, नाल्यांना पुनऊज्जीवन देण्यात येत आहे. नदी-नाल्यांचा विकास साधण्यात आला तशीच तलावांची खोदाई करून पुनऊज्जीवन देण्यात येत आहे. मात्र, यावेळी जिह्यात 200 हून अधिक तलाव कोरडे पडले आहेत. याचा परिणाम पिण्याचे पाणी व वापरासाठीच्या पाण्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. कोट्यावधी निधी खर्चूनही तलावात पाणीसाठा होत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाने ठोस उपाय हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील 200 तलाव पूर्णपणे सुकलेलेच
बेळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नदी, नाले पूर्णपणे सुकून गेले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 200 तलाव पूर्णपणे सुकले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिह्यातील काही गावांना प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. असे असताना उद्योग खात्री योजनेतून काही तलावांना पुनऊज्जीवन देण्याचे काम करण्यात आले आहे. वळिवाने यावर्षी म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही ही समस्या भेडसावणारी ठरली आहे.
जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बेळगाव जिल्ह्यात 300 तलाव आहेत. उद्योग खात्रीतून बऱ्याच तलावांना पुनऊज्जीवन देण्याचे काम करण्यात आले आहे. ही संख्या आता 300 हून अधिक झाली आहे. यामध्ये 29 हजार 548 हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. यापैकी 200 हून अधिक तलाव पूर्णपणे सुकले आहेत. वाढत्या तापमानामुळे तलावांचे सुक्या जमिनीत ऊपांतर झाले आहे. गावांमध्ये असलेल्या तलावांवरच अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी अवलंबून असतात. त्याचबरोबर गावातील जनावरांना पिण्यासाठी पाणी या तलावांमधीलच वापरले जाते. परंतु अनेक गावांमधील तलाव पूर्णपणे कोरडे झाले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहून अनेक शेतकरी आपली जनावरे विकत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळेनासे झाले आहे. जिल्ह्यातील 70 टक्के तलावांमध्ये पाणीच नसल्याने आंतर्जलाची पातळीदेखील घटली आहे. यावर्षी तलावांमध्ये पाणी नसल्याने या तलावांची खोली वाढविण्याचा निर्णय लघु पाटबंधारे विभागाने घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या नद्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे, त्या नद्यांमधील पाणी तलावांमध्ये सोडावे का, याबाबत विचार करून प्रशासन कोणता निर्णय घेणार यावरच ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आणखी 15 दिवस पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती
आणखी 15 दिवस पाऊस झाला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनणार आहे. जलपातळी घटल्याने वेगवेगळ्या माध्यमातून जमिनीत पाणी जिरविण्यासाठी जिल्हा पंचायत मोठे प्रयत्न करत आहे. मात्र, यश येत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या तलावांचे पुनरुज्जीवन झाले तरी त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम असणार आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे तलावांत पाणी सोडल्यास जलपातळी आणि पाणी समस्याही मिटणार यात शंका नाही. यासाठी पावसाळ्यापूर्वीच याचे नियोजन करणे गरजेचे आहे.









