प्रतिनिधी,कोल्हापूर
Ajit Pawar News : बारामती,बेळगावासारख्या जिल्ह्यांनी अल्पावधित विकास साधला.पण व्हिजन नसल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत हा जिल्हा मागे पडला आहे. लोकप्रतिनिधी,राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बघू-करू अशा प्रवृत्तीचा फटका कोल्हापूरकरांना बसला आहे,अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते,राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तिखट शब्दात मत व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सच्या कार्यालयाला शनिवारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भेट दिली.यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर,प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासावर सडेतोड शब्दात भाष्य केले. त्यांनी थेट लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.
पवार म्हणाले,गेल्या दहा वर्षात बारामती तर पंचवीस वर्षात बेळगाव जिल्ह्यांनी रस्ते,पाणी, स्वच्छता, रेल्वेसेवा, विमानसेवेमध्ये कोल्हापूरला मागे टाकले आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला हवा? या संदर्भात कोणतेच व्हिजन नसल्याने, अनेक प्रश्न प्रलंबित राहीले आहेत. बघू – करू अशा उत्तरामुळे विकास कामावर परिणाम झाला आहे. विकासाची जबाबदारी लोकप्रतिनिधीसह प्रशासानातील अधिकारी आणि नागरिक यांच्यावरही असते, असे सांगत पवार यांनी मतावर डोळा ठेऊन, पाच टक्के लोकांना खूष करण्यापेक्षा विकासकामावर लक्ष देणे गरजेचे आहे. कोणाचीही भिडभाड न ठेवता, विकासाठी कठोर व्हा, असे आवाहन केले.
कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यावे
कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेळगाव, बारामतीप्रमाणे विकास साधायचा असेल तर, प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व पक्षीयांनी एकत्रित यावे, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मतावर डोळा न ठेवता विकासाच्या प्रश्नात भूमिका घ्यावी, अशा शब्दात पवार यांनी आपले मत मांडले.
महापालिकांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करा : क्रिडाईची मागणी
राज्यातील सर्व महानगरपालिकेच्या अस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदलीबाब्तचे निवेदन विरोधी पक्षनेते अजित पवार यांना क्रिडाईतर्फे निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना हॉलमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला. आमच्या काळात असे नव्हते असा टोला अजित पवार यांनी दिला.
हेही वाचा- कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून नव्या चेहऱ्याला संधी
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, उद्योजक एम. बी. शेख व असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, विजय चोपदार, राज डोंगळे, सुधीर राऊत, उमेश कुंभार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, प्रशांत काटे, जयवंत बेगमपुरे, अंजली जाधव, प्रमोद पोवार, विजय पाटील, प्रशांत पाटील, उदय निचिते आदींसह क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत, उपाध्यक्ष गौतम परमार, संदीप मिरजकर आणि संचालक यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विविध प्रश्न, विषयांवरील निवेदन सादर
असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अॅन्ड इंजिनियर्स कोल्हापूरच्यावतीने यावेळी अजित पवार यांना पूर नियंत्रण, पूर प्रतिबंधक, कोल्हापूर प्रादेशिक आराखडा फेर सुनावणी अहवाल,ऑनलाईन बांधकाम परवानगी आदी विषयावरील निवेदन देण्यात आले.
महापूर का आला? : अजित पवारांनी सांगितली कारणे
कोल्हापुरात येत असलेल्या महापुराची कारणेही यावेळी अजित पवार यांनी सांगितली. ते म्हणाले, पूरक्षेत्रात भराव टाकण्यात आल्याचा फटका सर्वाधिक बसला. नदीचे पात्र अरूंद होणे, भरावामुळे पाण्याची फुग वाढणे, त्यामुळे नागरी वस्तीत पाणी घुसणे हे प्रकार घडले. काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाणी जमिनीत मुरत नाही, त्याचा फटकाही बसला. भरावाऐवजी कॉलम टाकले असते तर पूरस्थितीवर नियंत्रण ठेवता आले असते, असे सांगत पवार यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा- ‘पन्नास खोके’ जनतेच्या मनात बसले ; अजित पवारांचा शिंदे गटावर घणाघात
लाईट गेल्यावर अजितदादांचा टोला
कार्यक्रमाच्या शेवटी क्रिडाईचे पदाधिकारी अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले आणि अचानक सभागृहात विद्युत पुरवठा खंडीत झाला. यावेळी आमच्या काळात, असे नव्हते असा टोला अजितदादांनी लगावल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
कोल्हापूरच्या खासदारांनाही आवाहन
पंचगगा, रंकाळा प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी सहकार्य कारण्यास कटीबध्द आहे. प्रत्येक शहराची भौगोलिक रचना, जागतिक हवामानातील बदल, नदी-नाले याचा अभ्यास करून,केंद्र व राज्य सरकारने निकष बदलण्याची गरज आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हयातील खासदारांनी दिल्लीतही पाठपुरावा करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.