लोकायुक्त अंबादास जोशी यांचे प्रतिपादन
सांस्कृतिक प्रतिनिधी/फोंडा
समाजाचे रंजन हे राजकर्तव्य आहे. समाज रंजनविरहित असता कामा नये. संगीतातून तसेच साहित्यातून केलेली साधना ही साक्षात ईश्वराशी जोडलेली असते. प्रत्येक साहित्यिक हा सर्जक असतो आणि रसग्राहक पद्धतीने त्यांनी केलेली अक्षरनिर्मिती ही समाजाला गुह्याकडे जाण्याचा रस्ता दाखवितो, असे प्रतिपादन लोकायुक्त अंबादास जोशी यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
इन्स्टिट्यूट मिनेझेस ब्रागांझा संस्थेने आयोजित केलेल्या बहुभाषिक कवी लेखक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वझरी पेडणे येथील हिरा फार्मच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून माजी मंत्री अॅड. रमाकांत खलप, ‘तऊण भारत’चे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, आयोजन संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य आशा गेहलोत, कालिका बापट तसेच आयोजन संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. जोशी यांच्याहस्ते समई प्रज्वलन झाल्यानंतर सर्व साहित्यिकांना गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सन्माननीय पाहुणे रमाकांत खलप म्हणाले की जाती, वर्ण आणि प्रांतानुरूप भाषेची रूपे बदलत जातात. भाषेमध्ये लोकसाहित्य आहे, भाषेला लय असते, प्रत्येक भाषेला प्रतिष्ठा असते. भाषा ही रंगबेरंगी गोधडीप्रमाणे असते म्हणूनच ती सुंदर आणि उबदार असते. सगळ्या भाषांचा आदर करण्याचे आवाहन यावेळी अॅड. खलप यांनी याप्रसंगी केले. संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब यांनी स्वागत केले. बिंदीया नाईक यांनी इशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी धावस्कर यांनी केले तर सदस्य सचिव गोरख मांद्रेकर यांनी आभार मानले.









