गृहमंत्री अमित शाह यांचे उद्गार : 470 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा कार्यारंभ
► वृत्तसंस्था/ अहमदाबाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी गुजरातच्या द्वारकेमध्ये बीएसएफच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. सीमेवर बीएसएफ तैनात असल्यानेच दिल्लीत मी शांतपणे झोपू शकतो असे उद्गार शाह यांनी यावेळी काढले आहेत. शाह हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी ओखा येथे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगच्या स्थायी कॅम्पसचे भूमिपूजन केले आहे. हा कॅम्पस 470 कोटी रुपयांच्या निधीतून उभारले जाणार आहे. तत्पूर्वी शाह यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली होती.
शाह यांनी याचबरोबर कच्छ जिल्ह्यातील बीएसएफच्या पाच चौक्यांचे व्हर्च्युअल उद्घाटन देखील केले आहे. 164 कोटी रुपयांच्या निधीतून 18 किनारी चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. सागरी सीमेला लागून असलेली 9 राज्ये, 5 केंद्रशासित प्रदेशांची सागरी सीमा मजबूत करण्यासाठी नॅशनल अकॅडमी ऑप कोस्टल पोलिसिंगची स्थापना करण्यात आली होती. याकरता केंद्र सरकारने 441 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.
द्वारकेनंतर शाह हे अहमदाबाद तसेच गांधीनगर येथे जाणार आहेत. अहमदाबाद येथे रविवारी होणाऱ्या मोदी समुदायाच्या एका राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर गांधीनगर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन ते करणार आहेत.









