बीएसएफ जवानांची कारवाई : 2 किलो हेरॉइन जप्त
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या अमृतसरमध्ये बीएसएफने पाकिस्तानी तस्करांचे दोन प्रयत्न उधळून लावले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा बीएसएफने दोन पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यास यश मिळविले आहे. हे दोन्ही ड्रोन एकाच प्रकारचे आहेत. तर ड्रोनद्वारे पाठविण्यात आलेली हेरॉइनची खेप बीएसएफने हस्तगत केली आहे. ड्रोन मिळाल्यावर संबंधित परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली.
अमृतसर सेक्टरच्या अंतर्गत येणाऱ्या उधर धारीवाल आणि रत्न खुर्द भागात हे दोन्ही ड्रोन बीएसएफने पाडविले आहेत. पहिला ड्रोन शुक्रवारी रात्री 8.55 वाजता उधर धारीवालनजीक घिरट्या घालताना दिसून आला होता, ज्यानंतर बीएसएफ जवानांनी गोळीबार केला होता. गोळीबारादरम्यान हा ड्रोन खाली पाडविण्यास यश आले. संबंधित ठिकाणी शोध घेण्यात आला असता ड्रोन हस्तगत झाला. तर दुसरा ड्रोन रत्न खुर्द भागात आढळून आला आहे. येथे रात्री 9.55 वाजता ड्रोनचा आवाज ऐकू आला होता. बीएसएफच्या जवानांनी आवाजाच्या दिशेने गोळीबार केला होता. शोधमोहिमेदरम्यान शेतात ड्रोन आढळून आला आहे.
बीएसएफकडून रत्न खुर्द भागात पाडविण्यात आलेल्य ड्रोनजवळून दोन किलो हेरॉइनची खेप हस्तगत करण्यात आली. बीएसएफने अमली पदार्थ जप्त करत तपास सुरू केला आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 15 कोटी रुपये इतकी असल्याचा अनुमान आहे.
बीएसएफकडून पाडविण्यात आलेले ड्रोन क्वार्डकॉपर डीजेआय मेट्रिक्स 300 आरटीके प्रकारातील आहेत. पाकिस्तानी तस्कर या ड्रोनच्या माध्यमातून कमी वजनाची खेप भारतात पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात.









