पणजी : हायस्कूल्समधील मुलींची पायपीट थांबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पणजी मिड टाउनतर्फे नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. आपल्या सेवेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त क्लबतर्फे ग्रामीण गोव्यातील शाळांमध्ये मुलींना स्वतंत्र बनवण्याच्या, शिक्षणासाठी सुलभ आणि कार्यक्षम वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने गरीब मुलींना सक्षम करण्यासाठी मेगा सायकल वितरण कार्यक्रम येत्या 19 मे रोजी पणजीत होणार आहे. सायकलचा रंग उजळ गुलाबी जाणीवपूर्वक ठेवण्यात आला असून जेणेकरून समाजातील इतरांना आणि मुलींच्या कुटुंबांना या सायकली वापरण्यापासून किंवा चोरट्यांनी चोरण्यापासून परावृत्त केले जाईल. ही सायकल फक्त मुलींनी शालेय उद्देशासाठी व त्यांच्या गरजांसाठीच वापरावी, असा नियम ठरविण्यात आला आहे. पाचवी ते नववी इयत्तेत शिकणाऱ्या मुलींना 500 सायकली वितरित करण्यात येणार आहेत. 25 शाळांमध्ये प्रत्येकी 20 अशा तत्वावर वितरित करण्यात येतील.
अंतर, आर्थिक स्थितीच्या निकषावर निवड
शाळा आणि त्यांचे घर यांच्यातील अंतर, कुटुंबाची आर्थिक स्थिती या निकषावर मुलींची निवड करून त्यांना सायकल देण्यात येईल. सामाजिक कल्याणाला पाठिंबा आणि शिक्षणाचा प्रचार तसेच समाजातील कमी विशेषाधिकार असलेल्यांसाठी शाश्वत गतिशीलतेसाठी कार्य करण्याच्यादृष्टीने रोटरीचे हे पाऊल आहे.
पंचवीस हायस्कूल्समधील मुलींना सायकली
सायकल्स वितरणसाठी डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, वाळपई सत्तरी, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, कुजिरा, बांबोळी, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, कुर्टी फोंडा, एल. डी. सामंत हायस्कूल पर्वरी, एम. आय. बी. के. हायस्कूल खांडेपार, मांद्रे हायस्कूल मांद्रे, पार्से हायस्कूल पार्से, पीटर अल्वारिस मेमोरियल हायस्कूल मोरजी, एस.ई.एस. हायस्कूल कुडचडे, शारदा इंग्लिश हायस्कूल माशेल, शिक्षा सदन, प्रियोळ म्हार्दोळ, श्री भगवती हायस्कूल पेडणे, श्री दुर्गा इंग्लिश स्कूल पार्से, पेडणे, श्री दामोदर विद्यालय लोलये, श्री दयानंद आर्य हायस्कूल नेवरा, श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण, श्री वसंत विद्यालय हायस्कूल शिवोली, सेंट एलॉयसिस हायस्कूल दिवाडी, सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कूल शिवोली, सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे, सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल केरी, स्वस्तिक विद्यालय प्रियोळ म्हार्दोळ, युनियन हायस्कूल चिंबल, विकास हायस्कूल वळपे, विर्नोडा, पेडणे, व्हिस्काउंट हायस्कूल, नानेरवाडा,पेडणे या हायस्कूल्समधील मुलींना या सायकली देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हेल्मेट आणि सायकल लॉक देखील दिले जातील. या प्रकल्पाची एकूण किंमत 21 लाख रुपये असून या प्रकल्पासाठी व्हिएनार आणि थलासा यांचे सहकार्य लाभले आहे. हेल्मेट्स वेस्ट कोस्ट मोहित इस्पात फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत. शुक्रवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजता पणजी जिमखाना मैदानावर सायकलचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ, आरटीएन व्यंकटेश देशपांडे (रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे जिल्हा गव्हर्नर) यांची उपस्थिती लाभणार आहे.









