जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये साथीच्या आजारांचा शिरकाव होण्याची शक्यता : जिल्हा प्रशासन लक्ष देणार का?
बेळगाव : वळिवाने दडी मारली आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. या पाण्यामुळे आता गॅस्ट्रो, मलेरियासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वांनीच पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. बऱ्याच गावांना पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. यातच लग्न, यात्रा असे कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे हे आजार उद्भवण्याची शक्यता असून यासाठी ग्राम पंचायतीने काळजी घेऊन जागृती करणे गरजेचे आहे. यावर्षी वळीव पाऊस झालाच नाही. तसेच उन्हाचा तडाखाही वाढला आहे. तलाव, जलाशये, विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना पाण्यासाठी दूरवर न्यावे लागत आहे. सध्या असलेले पाणी पिऊन जनावरांना विविध आजार उद्भवू लागले आहेत. एकूणच पाणी टंचाईमुळे आता विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनतेचे आरोग्य धोक्यात
काही गावांत तर गटारी आणि इतर ठिकाणाहून निर्माण होणारे सांडपाणी विहिरीत शिरून पाणी दूषित होण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व पाईपलाईन दूषित होण्याचे प्रकार निदर्शनाला येऊ लागले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्राम पंचायती, जिल्हा आरोग्य खाते आणि संबंधित अधिकारीवर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वळिवाने पाठ फिरविल्यामुळे आता साऱ्यांचेच लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र, मान्सूनही उशिराने दाखल होणार आहे. त्यामुळे पाणी समस्या गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या काही गावांना होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याने बऱ्याच ठिकाणी ताप, फ्लू, टायफॉईड व गॅस्ट्रो आजारांनी नागरिक त्रस्त होताना दिसत आहेत. अशा ऊग्णांमुळे दवाखान्यांमध्येही ऊग्णांची गर्दी वाढू लागली आहे. ही समस्या गंभीर बनत असून यासाठी आरोग्य खात्याने तातडीने पावले उचलून रोगप्रतिबंधक औषधांचा तातडीने पुरवठा करणे गरजेचे बनले आहे.
पावसाने ओढ दिल्याने पाण्याची भीषण टंचाई
आतापर्यंत पावसाने ओढ दिली आहे. तालुक्यातील नदी, नाले व विहिरींनी तळ गाठला आहे. सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होताना दिसत आहे. तळाचे पाणी असल्याने अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यातच जलशुद्धीकरण यंत्रे बसविलेली असली तरी ती बंद आहेत. त्यामुळे बहुसंख्य गावांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे आता जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाणी उकळून पिणे गरजेचे
ग्राम पंचायतांच्या माध्यमातून विहिरीतील गाळ काढणे तसेच टीसीएल पावडर टाकणे गरजेचे आहे. आरोग्य खात्यानेही या पावडरीचा पुरवठा करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनीही पाणी उकळून पिणे तितकेच गरजेचे असून सर्वांनीच या साथीच्या आजारांसंदर्भात काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सध्या डेंग्यु, चिकुनगुनिया तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी आरोग्य विभाग पाऊल उचलत आहे. मात्र, जिल्हा पंचायतीनेही याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वच अधिकारी गुंतले होते. त्यांच्यावर कामाचा ताण अधिक होता. त्यामुळे इतर समस्या सोडविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
आरोग्यविषयक समस्यांचे निवारण करा
दरवर्षी जिल्हा प्रशासन पाणी टंचाईबाबत तातडीने बैठक बोलाविते. मात्र, यावर्षी अद्याप पाणी समस्येबाबत कोणतीच बैठक बोलाविण्यात आली नाही. जिल्ह्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावत असून त्या ठिकाणीही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. प्रादेशिक आयुक्तांनी तातडीने यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणे महत्त्वाचे बनले आहे. सध्या काही जलाशायांमधून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी अनेक गावांना पुरविले जात आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुसंख्य भागाला पाण्याची समस्या भेडसावत असून त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे आता त्या निवारण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज आहे.









