खानापूर : खानापूर तालुक्यातील मतदारांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तालुक्यातील जनतेला भाजपकडून निश्चित न्याय दिला जाईल. विकास आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. विठ्ठल हलगेकर यांच्या रुपाने तुम्ही तुमच्या माणसाला तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आपल्या अडीअडचणींसाठी थेट विठ्ठल हलगेकर यांना संपर्क साधावा, असे आवाहन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी येथील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सत्कारप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. तालुका जनरल सेक्रेटरी सानीकोप यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर माजी आमदार संजय पाटील, जिल्हा सेक्रेटरी सुनील पाटील, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, तालुक्यातील जनतेने भाजपला विक्रमी मताधिक्य दिल्याने जबाबदारी वाढलेली आहे. तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल.
जनतेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध
सत्काराला उत्तर देताना आमदार हलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी सर्वसामान्य जनतेला निश्चित न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, संजय कुबल यांचीही भाषणे झाली. अभिजीत चांदीलकर यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, बुथ कमिटी सदस्य यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









