लवकरच नियमित गाड्यांची होणार घोषणा
पणजी ; गेल्या महिन्यातच विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलेल्या मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरून काल मंगळवार 16 मे रोजी ‘वंदे भारत’ या सुमारे 180 किमी/तास वेगाने धावणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे वृत्त असून लवकरच नियमित रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईत सध्या तीन वंदे भारत ट्रेन असून मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-गांधीनगर राजधानी, मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या एक्स्प्रेस गाड्यांचा त्यात समावेश आहे. काल झालेल्या चाचणीनंतर चौथी वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन चालविण्यात येणार आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
वंदे भारत ही रेल्वे जास्तीत जास्त 180 किमी/तास वेगाने धावण्यास सक्षम असून मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक दरम्यानचे सर्वात उंच घाट कोणत्याही सपोर्टिंग इंजिनशिवाय चढणे आणि उतरण्याची क्षमता या फर्स्टक्लास गाड्यामध्ये आहे. त्याशिवाय जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आदी अत्याधुनिक सुविधांचाही त्यात समावेश आहे.
वर्षभरात 75 वंदे भारत रेल्वे
सेमी-हाय-स्पीड ही या प्रकारातील पहिली सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन असून त्यात एक्झिक्युटिव्ह क्लास डबे, 180 अंशांपर्यंत फिरू शकणाऱ्या रिव्हॉल्व्हिंग चेअर आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात प्रमुख मार्गांवर 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची सरकारची योजना आहे. सध्या 10 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत.









