प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी : सरकारी-अनुदानित-खासगी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
बेळगाव : तांत्रिक शिक्षणानंतर लगेचच नोकरीची संधी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निक अभ्यासाकडे कल वाढला आहे. दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. केवळ सरकारीच नाही तर अनुदानित व खासगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये फी माफक असल्याने येथे प्रवेश मिळविण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. बेळगाव परिसरात औद्योगिक वसाहती असल्याने पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना चांगले रोजगार उपलब्ध होत आहेत. बेळगावमधील उद्यमबाग, मच्छे, वाघवडे, अनगोळ, नावगे, काकती, होनगा, कंग्राळी औद्योगिक वसाहत याचबरोबर कणगला येथे नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बरेच विद्यार्थी आयटीआय, डिप्लोमा यासारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, अथणी व सदलगा या तीन ठिकाणी सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजिस आहेत. यामध्ये बेळगाव शहरातील सरदार्स कॉलेजशेजारी असलेल्या सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजला सर्वाधिक मागणी आहे. दहावीचा निकाल लागल्यापासून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. जात-उत्पन्न दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट, फोटो यासह इतर कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. यानंतर अर्जांच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. याचबरोबर अनुदानित कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. शहरात मराठा मंडळ, भरतेश व गोमटेश ही अनुदानित कॉलेज असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मागील काही वर्षात पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा पारंपरिक अभ्यासापेक्षा पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहर व परिसरात अनेक खासगी पॉलिटेक्निक कॉलेज असून तेथेही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धडपड दिसून येत आहे.
कॉम्प्युटर सायन्सकडे वाढता कल
कोरोनानंतरच्या काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रुजू झाली. यामुळे घरबसल्या उत्तम पगाराची नोकरी मिळू लागली आहे. त्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअर या शाखांपेक्षा विद्यार्थ्यांचा कल कॉम्प्युटर सायन्स विभागाकडे अधिक आहे. यावर्षी सर्वच कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सला अॅडमिशन घेणाऱ्यांची संख्या वाढली असून इतर अभ्यासक्रमांना मात्र विद्यार्थी अपुरे पडत आहेत. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल व कमर्शियल प्रॅक्टीस या अभ्यासक्रमांकडे यावर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.









