दर्जा तपासून-खात्री करूनच बियाणे खरेदी करा : अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
बेळगाव : य् ाावर्षी वळिवाने अद्यापही पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करताना अडचणी येत आहेत. बेळगाव तसेच इतर तालुक्यांमध्ये केवळ एकच मोठा वळीव पाऊस झाला आहे तर काही तालुक्यांमध्ये वळीव पाऊसच झाला नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. तरीदेखील आता भात व इतर पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत. साऱ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत. कारण पाऊस झाला तरच जमिनीमध्ये मशागत करणे सोपे जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे आता बियाणे खरेदीकडेही शेतकरी वळू लागले आहेत. मात्र बियाणे खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. खरिप पेरणीपूर्वी नियोजनाचे काम सध्या सुरू आहे. पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी बियाणांची निवड आणि खरेदी करताना घ्यावयाची काळजी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शेतीचे सारे भवितव्य जसे निसर्गावर अवलंबून असते, तसेच ते योग्य प्रतिच्या बियाणांवरही असते. बरेचसे शेतकरी याचा विचार करत नाहीत. यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतो. यामुळे पेरणीपूर्वीच योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बियाणांची खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण ज्या भागात उत्पादन घेतो तेथील स्थानिक वातावरणाला योग्य बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तशी शिफारस केलेली आणि शक्मयतो कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या संशोधन केंद्रात तयार झालेली बियाणे घेणे योग्य ठरते. कृषीखाते किंवा इतर खासगी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करताना ती मान्यताप्राप्त आहेत की नाहीत, तसेच योग्य संशोधन झालेली आहेत का? हे न पाहिल्यास फसवणूक होण्याची शक्मयता अधिक असते. याकडे बळीराजाने लक्ष द्यायला हवे.
बियाणे निवडताना काळजी घेणे महत्त्वाचे
बियाणांची निवड करताना ते चांगल्या प्रतीचे व प्रमाणित आहे की नाही, याची काळजी प्रथम घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांची नेमणूक शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करण्यासाठीच सरकारने केलेली असते. बऱ्याचवेळा शेतकरी मनामध्ये भीती बाळगून अशा अधिकारीवर्गाकडे जाणे टाळतात. दरम्यान अशा अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास जिल्हा कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे बाजारपेठेत उपलब्ध करावीत, अशी सूचना देणे गरजेचे आहे.









