वृत्तसंस्था/ धरमशाला
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ बुधवारी येथे आमनेसामने येणार असून आयपीएलमधील प्ले-ऑफ स्तरावर स्थान मिळविण्याच्या आशा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मोठा विजय नोंदविण्यास पंजाबचा संघ उत्सुक असेल, तर दिल्लीसाठी हा सामना केवळ प्रतिष्ठा सावरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पंजाब किंग्सने सहा पराभव स्वीकारलेले असून तितकेच विजय मिळविलेले आहेत. ते 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत आणि अद्याप ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत.
तथापि, पंजाब किंग्सने त्यांची धाव सरासरी सुधारण्याची गरज आहे, जी उणे 0.268 वर आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध मिळविलेल्या 31 धावांच्या विजयाने त्यांची धावसरासरी आणि मनोबल वाढले आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हा संघ पुढील सामन्यांत विजय मिळवून त्यानंतर इतर निकालही आपल्याला अनुकूल असे लागतील, अशी आशा बाळगून असेल. पंजाबला फलंदाजीत अधिक सुधारणा करावी लागणार आहे. दिल्लीविऊद्ध सलामीवीर प्रभसिमरन सिंगने एकाकी झुंज दिली. त्यांचा सर्वोत्कृष्ट फलंदाज धवन आणि प्रभसिमरन सिंग वगळता फारच कमी फलंदाजांनी पुरेसे योगदान दिले आहे.
त्यांच्या गोलंदाजांनीही अधिक सुधारित कामगिरी करणे आवश्यक आहे. नॅथन एलिस, सॅम करन आणि अर्शदीप सिंग हा मारा प्रभावी वाटत असला, तरी अनेकदा तो लक्ष्य गाठण्यापासून प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात अपयशी ठरला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम दु:स्वप्न ठरला आहे आणि ते आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. त्यांच्या फलंदाजीने संपूर्ण हंगामात निराशा केली आहे. अक्षर पटेल वगळता दिल्लीच्या संघातील भारतीय फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन घडविलेले आहे. पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान यांच्या अपयशाने दिल्ली कॅपिटल्सला या मोसमात जबरदस्त फटका दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या थिंक-टँकला सर्व परदेशी खेळाडूंना शीर्षस्थानी ठेवणे भाग पडले आहे.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर, यष्टीरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट आणि अष्टपैलू मिचेल मार्श यांनी डावाला गती मिळवून दिलेली असली, तरी एकदा ते गेल्यावर मधली फळी कोळळणे हे चित्र अनेकदा पाहायला मिळालेले आहे. पंजाबविऊद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरामात विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली होती, परंतु नंतर 67 धावांत त्यांनी आठ गडी गमावले. दिल्लीच्या संघातील भारतीय गोलंदाजांची कामगिरी फलंदाजांइतकी खराब नाही. त्यांचे चारपैकी तीन विजय हे प्रभावी गोलंदाजीमुळे प्राप्त झालेले आहेत. त्यात इशांत शर्माने आपले काम चोख बजावलेले आहे तसेच खलील अहमदच्या पुनरागमनानेही मदत केली आहे. वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतलेला अॅनरिक नॉर्त्जे परतला आहे, पण दिल्ली कॅपिटल्स संघ चार विदेशी फलंदाजांना खेळविणे पसंत करतो की, दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाला संधी देतो ते पाहावे लागेल. त्यांच्या कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने चांगली गोलंदाजी केली आहे.
संघ : पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), शाहऊख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान, अमन हकीम खान, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोवमन पॉवेल, रिली रोसो, एनरिक नॉर्त्जे, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, प्रवीण दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेश नागरकोटी, यश धुल.









