एका कॅलेंडर वर्षात सर्व प्रकारांत शतकाची नोंद
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने एका कॅलेंडर वर्षात कसोटी, एकदिवसीय लढती, टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावणारा इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळविला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी सनरायजर्स हैदराबादविऊद्धच्या सामन्यात शुबमनने 58 चेंडूंत 101 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि कारकिर्दीत वरील आणखी एक उल्लेखनीय विक्रम जोडला.
शुबमनने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या काही प्रतिष्ठित खेळाडूंच्या यादीत स्वत:चा समावेश करून वर्षाची सुऊवात केली. न्यूझीलंडविऊद्ध हैदराबादमध्ये त्याने 149 चेंडूंत 208 धावा केल्या. त्यानंतर आपल्या आवडत्या मैदानावर खेळताना शुबमनने अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविऊद्ध पहिले टी-20 शतक झळकावले. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने त्यावेळी 99 चेंडूंत नाबाद 126 धावा फटकावल्या होत्या.
त्याशिवाय गुजरातच्या या फलंदाजाने यावर्षी ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्याच मैदानावर कसोटीमध्येही शतक झळकावले. त्या सामन्यात त्याने 128 धावा केल्या. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने 48 च्या सरासरीने आणि 146.19 च्या स्ट्राइक रेटने 576 धावा केल्या आहेत. त्याने 13 सामन्यांत चार अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.
शुबमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीतील प्रभावी कामगिरीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधील त्या सामन्यात गुजरात टायटन्सला सनरायजर्स हैदराबादविऊद्ध 34 धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. नऊ विजय आणि चार पराभवांसह त्यांचे 18 गुण झाले आहेत.









