वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवीन संसद भवनाचे कामकाज जवळपास पूर्ण झाले असून या महिन्याच्या अखेरीस त्याचे औपचारिक उद्घाटन होण्याची शक्मयता आहे. 2014 मध्ये 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या सोहळ्याला आता नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संसद भवनाचे उद्घाटन केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अंदाजे 970 कोटी ऊपये खर्चून बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या संसदेत अनेक आधुनिक, हायटेक आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
नव्या इमारतीतील अंतर्गत भागाचे कामकाज अजूनही सुरू असल्यामुळे जुलैपासून सुरू होणारे आगामी पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीत होण्याची शक्मयता कमी आहे. मात्र, जी-20 देशांच्या प्रतिनिधींची एखादी बैठक या वर्षाच्या अखेरीस नवीन इमारतीत होऊ शकते. भारत 2023 साठी जी-20 चे अध्यक्षपद भूषवत आहे.
त्रिकोणी आकाराच्या नवीन संसद भवनाचे बांधकाम 15 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले होते. 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधलेल्या या चार मजली इमारतीत 1,224 खासदार बसू शकतात. नवीन संसद भवनात तीन मुख्य दरवाजे आहेत. या प्रवेशद्वारांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. या इमारतीत खासदार, व्हीआयपी आणि अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. संविधान सभागृह हे या इमारतीचे आणखी एक आकर्षण आहे. या कक्षामध्ये भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत ठेवली जाणार आहे. सदर इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.









