लँड फॉर जॉब्स प्रकरणात सीबीआयची कारवाई
► वृत्तसंस्था/ पाटणा, भोजपूर
लँड फॉर जॉब्स प्रकरणात सीबीआयने देशभरात 9 ठिकाणी छापे टाकले आहेत. माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आमदार किरण देवी यांच्या मालमत्तांवर मंगळवारी छापे टाकण्यात आले. यासोबतच नोएडा, दिल्ली आणि गुऊग्राममधील आरजेडीचे राज्यसभा खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.
आरा आणि पाटण्यासह अन्य ठिकाणी मंगळवारी सकाळी 6 वाजता एकावेळी धाड टाकत सीबीआयचे कारवाईला प्रारंभ केला. वेगवेगळ्या आठ पथकांकडून ही कारवाई हाती घेण्यात आली होती. सीबीआय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांनाही तैनात करण्यात आले होते. दिवसभर या ठिकाणांवर सीबीआयकडून चौकशी व शोधमोहीम सुरू होती.
राजदच्या आमदार किरण देवी या वाळू व्यापारी अऊण यादव यांच्या पत्नी आहेत. अऊण यादव यांचा अंगियाव येथे एक आलिशान बंगला असून तेथेही सीबीआयचे पथक पोहोचले होते. छाप्यादरम्यान पती-पत्नी दोघेही घरात हजर होते. किरण देवी या आरा संदेशच्या विद्यमान आमदार आहेत. किरण देवी पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्या माजी आरजेडी आमदार आणि बाहुबली नेते अऊण यादव यांच्या पत्नी आहेत. त्यांना गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच राजदने तिकीट दिले होते.









